Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनोखा नादानुभव आणि परिपक्व गायनाला दाद; रंगला सवाईचा दुसरा दिवस विस्तृत...

अनोखा नादानुभव आणि परिपक्व गायनाला दाद; रंगला सवाईचा दुसरा दिवस विस्तृत स्वरपट सिद्धहस्त वादनाला संयत पण दमदार तबलासाथही ठरली दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य

पुणे, दि. ११ डिसेंबर, २०२५ : ‘सवाई’च्या दुसर्‍या दिवसाचा उत्तरार्ध सतार आणि सॅक्सोफोनचे विलक्षण रंगतदार सहवादन आणि विदुषी पद्मा देशपांडे यांच्या परिपक्व गायनाने स्मरणीय ठरला. विदुषी पद्माताईंनी राग शामकल्याण सादर केला. ‘जियो मेरो लाल…’ हा पारंपरिक ख्याल त्यांनी दमदारपणे पेश केला. त्रितालात निबद्ध ‘रघुनंदन खेलत…’ ही स्वरचित बंदिशही त्यांनी सादर केली. गायन क्षेत्रातील दीर्घ अनुभव, घराणेदार तालीम, सादरीकरणातील परिपक्वता यांचे दर्शन त्यांच्या गायनातून घडले. सोहनीबहार रागातील ‘नाथ देहो मोहें…’ ही एकतालातील बंदिश त्यांनी ऐकवली. ‘संगीत स्वयंवर’ या नाटकातील ‘करीन यदुमनी सदना…’ या नाट्यपदाने त्यांनी विराम घेतला. त्यांना धनंजय खरवंडीकर (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) तसेच श्रुती देशपांडे व सुनीता कुलकर्णी यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

 

ज्येष्ठ वादक जॉर्ज ब्रुक्स आणि सतारवादक पं. कृष्ण मोहन भट या कलाकारांचे सॅक्सोफोन आणि सतार सहवादन, हा आजच्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एक अप्रतिम स्वरानुभव ठरला. राग चारुकेशीच्या माध्यमातून या दोन्ही सिद्धहस्त कलाकारांनी आपापल्या वाद्यांवरील प्रभुत्व, वाद्यांच्या सौंदर्य निर्मितीच्या विविध शक्यतांचा स्वरपट रूपक तालाच्या साथीने उलगडत नेला. सतारीचे नाजुक झंकार सॅक्सोफोनच्या गंभीर नादाशी एकरूप होऊन गेले होते. त्यानंतर या दोन्ही कलाकारांनी मांड रचना पेश केली. पाठोपाठ राग वृंदावनी सारंगमधील रचनेतून वेगळे नाद वैविध्य समोर आणले. उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासह केलेव्या सांगीतिक प्रकल्पातील अहिरी रागावर आधारीत रचनेने या विलक्षण रंगतदार सहवादनाची सांगता झाली. या रंगतीत तबलावादक ओजस अढिया यांच्या नजाकतदार वादनाने अधिक रंग भरले. संदीप जाधव यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

 

रसिकांशी संवाद साधताना जॉर्ज ब्रुक्स म्हणाले, “आमची ४०-४५ वर्षांपासूनची मैत्री आहे. पंडित कृष्णमोहन भट यांनीच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली. त्यांच्यासोबत राहूनच मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. त्यांना ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव आहे. सतार हे वाद्यच विलक्षण आहे. त्यात पं. कृष्णमोहन भट हे वाद्य छेडतात तेव्हा निर्माण होणारी जादू अद्भुत असते. पं. भीमसेन जोशी यांनी दिल्लीत सादर केलेला दरबारी अजूनही माझ्या लक्षात आहे.” पं कृष्णमोहन भट यांचा एकदा अपघात झाला होता, ते कारबाहेर फेकले गेले. त्यांना असंख्य जखमा झाल्या होत्या. ते सहा महिने रुग्णालयात होते. आज ते आपल्यासमोर सादरीकरण करण्यासाठी मंचावर आहेत, हा खरोखर चमत्कार आहे असेही ब्रूक्स यांनी नमूद केले. आनंद देशमुख यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments