Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रेसर...

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रेसर – आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डूडूळगाव येथील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील ७५५ सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर….

 

पिंपरी, दि. १५ डिसेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना चांगले घर मिळावे तसेच झोपडपट्टीविरहित शहर असावे, यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून शहरातील प्रत्येक गरजू व बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका अग्रेसर आहे. आज प्रधानमंत्री आवास योजनेतील डूडूळगाव येथील व आर्थिक दुर्बल घटकांच्या किवळे प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमध्ये निवड झालेल्या नागरिकांचे शहरातील स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डूडूळगाव येथे उभारलेल्या प्रकल्पातील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांच्या ७५५ सदनिकांचे पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संगणकीय सोडत झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते सोडतीमध्ये विजेत्या सदनिका लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पत्रांचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, सीओईपीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर आगासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, माजी नगर सदस्य सागर आंघोळकर, सहाय्यक आयुक्त डी. डी. कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आमदार जगताप पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर हे देशात सातव्या व राज्यात पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर म्हणून नावारूपास आले आहे. या शहरात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून पिंपरी चिंचवड महापालिका नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण करीत आहे. सदर सोडत पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे. आजच्या सोडतीत घर न मिळाल्यास नागरिकांनी निराश होऊ नये. तर त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना २.० साठी अर्ज करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रास्ताविक केले. तर उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सदर योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार उपायुक्त बोदडे यांनी मानले.

 

 

 

कोट

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत डूडूळगाव येथील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील ७५५ सदनिकांच्या संगणकीय सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

— अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी

चिंचवड महापालिका

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments