पुणे, दि. 17 (जिमाका वृत्त सेवा) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे चारचाकी वाहनांसाठी एमझेड ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेचे आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक आगाऊ राखून ठेवण्यासाठी अर्ज प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
चारचाकी वाहन मालकांना नवीन एमझेड मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरून राखीव ठेवायचे असल्यास त्यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्जासोबत डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. सदर डीडी DY. RTO, Pimpri Chinchwad यांच्या नावे नॅशनलाइज्ड / शेड्युल्ड बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 व महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक राहील.
चारचाकी वाहनांच्या क्रमांकांची यादी 19 डिसेंबर 2025 रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी अधिक रकमेचा डीडी सादर करावयाचा असल्यास त्यांनी 19 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात अर्ज कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदारांसमोर पाकिटे उघडण्यात येतील. विहित शुल्कापेक्षा सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या पात्र अर्जदारास संबंधित पसंतीचा नोंदणी क्रमांक वितरित करण्यात येईल. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित क्रमांक ऑनलाइन पद्धतीने आरक्षित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देण्यात येणार नाही. नोंदणी क्रमांक राखीव ठेवल्याच्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास तो क्रमांक आपोआप रद्द होऊन भरलेली फी शासनजमा होईल. कोणत्याही परिस्थितीत आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी भरलेली फी परत मिळणार नाही अथवा समायोजित केली जाणार नाही. आकर्षक क्रमांकाच्या शुल्कात बदल झाल्यास त्या वेळी लागू असलेले शुल्क आकारले जाईल, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
0000
0


