पुणे,22 डिसेंबर 2025 : पुण्यात पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन,घोले रोड येथे सुंबरान आर्ट फाऊंडेशन तर्फे आयोजित सुंबा आर्टफेस्ट 2025 मध्ये कलानिधी पुरस्कार प्रदान करण्यात आले.पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पद्मश्री वासुदेव कामत व पद्मश्री अच्युत पालव या दोन दिग्गज कलाकारांचा ट्रस्टमार्फत या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.एथनोग्राफी छायाचित्रकार श्री. श्रीकृष्ण परांजपे यांना कलानिधी कृतज्ञता पुरस्कार २०२५ तसेच कागदी शिल्पकार व चित्रकार श्री. सतीश घाटपांडे व व्हीनस ट्रेडर्स चे संचालक सुरेंद्रभाई करमचंदानी यांना कलानिधी कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
याप्रसंगी चैत्रा क्रिएशन्सच्या संस्थापिका व उद्योजिका तसेच कै. प्रा. गुरव यांच्या कन्या चित्रा मेटे उपस्थित होत्या. ज्येष्ठ चित्रकार कै.प्रा.रावसाहेब गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित सुंबा आर्टफेस्ट 2025 चे 22 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असून आदिवासी कलाकृती लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.
या महोत्सवात पद्मश्री पुरस्कार प्राप्त कलाकार अच्युत पालव आणि वासुदेव कामत यांच्या प्रेरणादायी थेट कला सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. अच्युत पालव यांनी कॅलिग्राफीचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. या कार्यक्रमात वासुदेव कामत यांनी अच्युत पालव यांच्या उपस्थितीत त्यांचे थेट चित्र रेखाटले. एका पद्मश्री कलाकाराने दुसऱ्या पद्मश्री कलाकाराला कलेद्वारे दिलेली ही दुर्मिळ मानवंदना उपस्थितांसाठी अविस्मरणीय क्षणांची पर्वणी अनुभवायला मिळाली.
कलाकारांच्या कलाकृतीचे कायदेशीर संरक्षण करण्याच्या हेतूने आर्टिस्टस स्टँड प्रोटेक्टेड हा उपक्रम जाहीर केला. कार्यशाळा, कायदेशीर मार्गदर्शन तसेच कॉपीराइट, करार आणि कलाकारांच्या हक्कांबाबत जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाकारांना योग्य श्रेय मिळावे, कलाकृतींचा गैरवापर टाळावा आणि कलाकार आत्मविश्वासाने आपली कला साकारू करू शकतील, हा या उपक्रमाचा उद्देश
आहे.


