पुणे, दिनांक २ जानेवारी २०२६: बंधुतेच्या मार्गानेच समाजात समता प्रस्थापित करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या याच बंधुतेची समाजाला गरज आहे. असे मत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी व्यक्त केले. सामाजिक समरसता मंच आयोजित बंधुता परिषदेत ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३९ च्या एप्रिल महिन्यात पुण्यात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला भेट दिली होती. त्याच पेरू गेट भावे हायस्कूलमध्ये सामाजिक समरसता मंचाच्या वतीने बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर मकवाना, आयडीबीआय आणि इंडियन बँकेचे माजी अध्यक्ष किशोर खरात, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, खा. बाळासाहेब साळुंके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कश्यप साळुंके, भंते बुधभूषण उपस्थित होते.
किशोरजी मकवाना म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे येथील संघ शिबिराला भेट दिल्याचे माहिती होते. मात्र, आज प्रत्यक्ष या भेटीचा ऐतिहासिक संदर्भ मांडला गेला. डॉ. आंबेडकरांनी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली नाही. उलट संघाकडे ते आपलेपणाच्या भावनेने पाहत होते. डॉ. आंबेडकरांच्या बंधुतेचे स्मरण या परिषदेच्या निमित्ताने होत आहे.”
किशोर खरात यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात बंधुता गीताने झाली. रवी ननावरे यांनी सामाजिक समरसता मंचाची माहिती दिली. सुनील वारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाची सांगता भंते बुधभूषण यांनी बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सांगता केली.


