Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्पेस क्षेत्रात करिअरच्या रोमांचक संधी इस्रो-एसपीपीयू स्पेस टेक्नॉलॉजी सेलचे डायरेक्टर डॉ. अरविंद...

स्पेस क्षेत्रात करिअरच्या रोमांचक संधी इस्रो-एसपीपीयू स्पेस टेक्नॉलॉजी सेलचे डायरेक्टर डॉ. अरविंद शालिग्राम यांचा सल्ला एमआयटी-डब्ल्यूपीयूत नॅशनल स्पेस डे चे आयोजन

पुणे, २२ ऑगस्ट : “पृथ्वीवरील समस्या सोडविण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. अंतराळ मोहिमांमधून विकसित झालेली माहिती व क्षमता समाजाला कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकतात, याचा विचार करणे हीच खरी संधी आहे. विद्यार्थ्यांसाठी या स्थित्यंतराने एरोस्पेस अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, रिमोट सेन्सिंग, इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सायन्स, मटेरियल अभियांत्रिकी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या रोमांचक संधी उपलब्ध झाल्या आहेत,” असा सल्ला एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनचे एमडी आणि सीईओ तसेच इस्रो-एसपीपीयू स्पेस टेक्नॉलॉजी सेलचे डायरेक्टर डॉ. अरविंद शालिग्राम यांनी दिला.

नॅशनल स्पेस डे निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कॉसमॉस अस्ट्रॉनॉमी क्लब, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स आणि AXSX च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय “स्पेस एक्स्पो २०२६” च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी डीईएमएचे अध्यक्ष डॉ. शिरीष देशमुख, इस्रोचे माजी वैज्ञानिक हिरेन भट्ट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. दत्ता दंडगे, डॉ. अनुप काळे आणि डॉ. सचिन कुलकर्णी उपस्थित होते.

माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वादाने आणि एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. अरविंद शालिग्राम म्हणाले, “भारतीय अंतराळ क्षेत्र हे दीर्घकाळापासून वैज्ञानिक उत्कृष्टता आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. १९७५ मधील आर्यभट्टाच्या प्रक्षेपणापासून ते यशस्वी चांद्रयान आणि मार्स ऑर्बिटर मोहिमांपर्यंतचा काळ असो, नवोन्मेष आणि चिकाटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाची कामगिरी शक्य आहे हे इस्रोने दाखवून दिले आहे. आज भारतात खाजगी उद्योग हे सरकारी संस्थांसोबत हातमिळवणी करून देशाचे अंतराळातील भविष्य घडवत आहेत. जसजसे आपण अंतराळ मोहिमांकडे वाटचाल करत आहोत, तसतसे आपल्याला विश्वसनीयता, दळणवळण, ऊर्जा, दिशादर्शन, जीवन-आधार प्रणाली, सुरक्षा आणि दीर्घकाळ कार्यरत राहण्याच्या क्षमतेबद्दल काळजीपूर्वक विचार करावा लागत आहे. ही आव्हाने केवळ एक संस्था सोडवू शकत नाही. त्यासाठी शास्त्रज्ञ, अभियंते, विद्यापीठे, उद्योग आणि धोरणकर्त्यांना एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे.”

हिरेन भट्ट म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या आधारे भविष्य बदलणार आहे. पण विज्ञानाबरोबरच प्रकृती आणि अध्यात्माची कास धरावी. मूल्यांच्या आधारे सतत स्वतःचा विकास साधावा.”

डॉ. दत्ता दंडगे म्हणाले, “नवी पिढी स्पेस संदर्भात अतिशय उत्सुक आहे. या विद्यापीठामध्ये विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण दिले जाते.”

डॉ. शिरीष देशमुख यांनी स्पेस क्षेत्रात कार्य करताना आवड, ज्ञान आणि नवनवीन कल्पना या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.

डॉ. अनुप काळे यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. विद्यार्थी तन्वी आणि सोहम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन कुलकर्णी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments