पुणे : भारत मातेचा जयघोष आणि सैनिकांच्या वीरतेला नमन करीत विद्यार्थ्यांनी आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सैनिकांना मकर संक्रांतिनिमित्त पाठविण्यात येणाऱ्या तिळगुळाचे पूजन केले. यंदा तब्बल ५०० किलो तिळगुळ सैनिकांना पाठविण्यात आला.
सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पा बळवंत चौकातील नूमवि प्राथमिक शाळेच्या सभागृहात तिळगूळ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजन वडके, १९ मराठा लाईट इन्फ्टंट्रीचे निवृत्त मेजर बजरंग निंबाळकर, गायिका मनीषा निश्चल, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यावेळी उपस्थित होते. ५०० किलो तिळगूळाचे पूजन यावेळी करण्यात आले. उपक्रमाचे यंदा २८ वे वर्ष आहे. विष्णू ठाकूर, अनिल पानसे, नीला कदम, दत्तात्रय वेताळ, कल्याणी सराफ, शेखर कोरडे यांनी आयोजनात सहकार्य केले.
आनंद सराफ म्हणाले, माणसाचे माणसाशी असणारे नाते दृढ करणारे भारतीय सण आहेत. आपल्यासाठी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी तिळगुळाचा गोडवा पुणेकरांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सन १९९७ पासून सैनिकांसाठी तिळगुळ पाठविण्याचा हा उपक्रम सुरू आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशवासीयांच्या वतीने सैनिकांना तिळगुळ पाठविण्यात येतो.
बजरंग निंबाळकर म्हणाले, लढ म्हणणारा आणि पाठीवर शाब्बासकीची थाप देणारा कोणी असेल तर सैनिक सीमेवर लढू शकतो. समाज चांगला असेल तर चांगले सैनिक घडण्यासाठी मदत होते. दिवाळी फराळ, भेटवस्तू, तिळगुळ सगळ्यात जास्त पुण्यातूनच सैनिकांना येतो. सैनिकांना सगळ्यात जास्त सन्मान पुणेकर देतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. राजन वडके, ब्रिजमोहन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले
.


