पुणे, दि. ९ जानेवारी २०२६ : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ) लोकार्नो, बर्लिन, कान्स आणि व्हेनिस अशा जगामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवात गाजलेले चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांत वेगवेगळ्या विभागांमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट यावर्षी प्रदर्शीत झाले असून, ते एकत्रीतपणे पाहण्याची संधी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ) मिळणार आहे.
लोकार्नो चित्रपट महोत्सव हा १९४६ पासून स्वित्झर्लंडमधील लोकार्नो येथे आयोजित केला जाणारा प्रतिष्ठित वार्षिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवात यावर्षी गाजलेले ‘व्हाईट स्नेल’, ‘टेल्स ऑफ द वुंडेड लँड’, डिझायर लाईन्स’, ‘सोलोमामा’, ‘हेअर पेपर वॉटर’ आणि ‘द फीन’ हे चित्रपट ‘पिफ’मध्ये पाहायला मिळणार आहेत.
१९३२ साली सुरू झालेला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव आहे. या चित्रपट महोत्सवातील ‘ला ग्राझिया’ हा चित्रपट ‘पिफ’मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून दाखवण्यात येणार आहे आणि ‘फादर मदर सिस्टर ब्रदर’, हा चित्रपट क्लोजिंग फिल्म म्हणून दाखवण्यात येणार आहे. यांशिवाय ‘सायलेंट फ्रेंड’, ‘नो अदर चॉईस’, ‘एलिसा’, ‘मेमरी’, ‘अ इयर ऑफ स्कुल’, ‘अॅट वर्क’, ‘लास्ट नाईट आय कॉकर द सिटी ऑफ थेब्स’, ‘द होली बॉय’, ‘द आयव्ही’, ‘लॉस्ट लँड’ आणि ‘द सुफ्लेअर’ हे चित्रपट ‘पिफ’मध्ये पाहता येणार आहेत.
इ.स. १९५१ साली पश्चिम बर्लिनमध्ये सुरू झालेला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील एक प्रमुख चित्रपट महोत्सव आहे. या चित्रपट महोत्सवात यावर्षी गाजलेले ‘ब्ल्यू मून’, ‘कॉन्टिनेंटल २५’, ‘लेट शिफ्ट’, ‘द आइस टॉवर’, ‘द समर इन पॅरिस’, ‘डिस्को आफ्रिका: अ मालागासी स्टोरी’, ‘द आईस टॉवर’, ‘डिफ/सोर्डा’, ‘ईल’, ‘हिस्टेरिया’, ‘लिटिल ट्रबल गर्ल्स’, ‘मदर्स बेबी’, ‘वुई बिलिव्ह यू’, ‘द बोटॅनिस्ट’, ‘द गुड सिस्टर’, ‘द नेचर ऑफ इनव्हिजीबल थिंग्ज’ आणि ‘द ओल्ड वुमन वुईथ द नाईफ’ हे चित्रपट जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या ‘पिफ’महोत्सवात दाखवले जाणार आहेत.
कान्स या फ्रान्समध्ये दरवर्षी भरणाऱ्या महोत्सवात यावर्षी दाखवलेले ‘द रिचेस्ट वुमन इन द वर्ल्ड’, ‘मिस्टेरियस गेझ ऑफ द फ्लेमिंगो’, ‘अॅडम्स सेक’, ‘अल्फा’, ‘इट वॉज जस्ट अॅन अक्सिडेंट’, ‘सिरात’, ‘यंग मदर्स’, ‘इगल्स ऑफ द रिपब्लिक’, ‘साऊंड ऑफ फॉलिंग’, ‘सेंटीमेंटल व्हॅल्यू’, ‘लव्ह मी टेंडर’, ‘ब्लॅक स्नेक’, ‘अ लाइट दॅट नेव्हर गोज आऊट’, ‘आयशा कान्ट फ्लाय अवे’, ‘कॅराव्हान’, ‘डेथ डज नॉट एक्झिस्ट’, ‘हर विल बी डन’, ‘मिटीओर्स’, ‘माय फादर्स शॅडो’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन गाझा’, ‘पीक एव्हरीथिंग’, ‘प्रेसिडेंटस् केक’, ‘रोमेरीया’, ‘द लिटिल सिस्टर’, हे चित्रपट यावर्षी ‘पिफ’ मध्ये दाखवले जाणार आहेत.
यांशिवाय बुसान चित्रपट महोत्सवातील ‘स्पाईंग स्टार्स’ आणि सनडान्स चित्रपट महोत्सवतील ‘डिजे अहमेट’, हे चित्रपटही ‘पिफ’मध्ये दाखवले जाणार आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पिफ)चे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “जगभरातील महत्त्वाचे आणि आशयसंपन्न चित्रपट पुण्यात आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षीही अतिशय दर्जेदार आणि जगभरातील महोत्सवांमध्ये गाजलेले चित्रपट ‘पिफ’मध्ये दाखवले जाणार आहेत.”
पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील १० स्क्रीनवर होत असून, त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.


