पुणे : आपण उद्योग करत असताना ज्या पदार्थाशी किंवा उत्पादनाशी संबंधित उद्योग करतो, त्याची आपल्याला आवड असणे गरजेचे आहे. केवळ पैशासाठी व्यवसाय केल्यास तो फार काळ टिकत नाही. खाद्यपदार्थ व्यवसायामध्ये ग्लोबल ब्रँडसोबत स्पर्धा करणे हे केवळ तुमच्या गुणवत्तेमुळेच शक्य होते. गुणवत्ता असेल तर निश्चितच ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतो, असे मत उद्योजक तुषार केळकर यांनी व्यक्त केले.
मएसो सीनियर कॉलेज, पुणे, डिक्की नेक्स्टजेन, आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उद्यमी संवाद – कथा उद्योगाची प्रवास उद्योजकाचा भाग ८ या कार्यक्रमामध्ये सर्वेश देशपांडे यांनी तुषार केळकर यांची मुलाखत घेतली. नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संचालक प्रा. डॉ. देविदास गोल्हार, मएसो सीनियर कॉलेज, पुणे, प्राचार्य डॉ. रविंद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत, स्टार्टअप सेल समन्वयक निलेश यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तुषार केळकर म्हणाले, आजच्या तरुणांनी नोकरी करत असताना केवळ नोकरीसाठी म्हणून आपला वेळ देऊ नये, तर त्यातून काहीतरी शिकून त्याचा व्यवसाय कसा करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करताना आपण त्या उद्योगांपेक्षा वेगळे काय देऊ शकतो, हे सतत आपल्या डोक्यात असले पाहिजे. व्यवसायांचे अनुभव, त्यातून मिळालेले शिकवण, आलेल्या अडचणी तसेच अपयशावर मात करून यशस्वी कॅफे साखळी उभारण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास सविस्तरपणे मांडला.
यावेळी प्रा. डॉ. देविदास गोल्हार, यांनी स्टार्टअप जनजागृती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेचे भविष्यातील उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचा हा उपक्रम इतर महाविद्यालयांपेक्षा एक पाऊल नक्कीच पुढे असून कौतुकास्पद आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तेजस्विनी ढमाले विद्यार्थी सूत्रसंचालक म्हणून कार्यक्रमाची धुरा सांभाळली, तर कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थीनी अनन्या पाटील ने आभार प्रदर्शन करून केला. प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित
होते.


