पुणे, 12 मार्च २०२६ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉई फेडरेशन आणि पुणे जिल्हा बँक कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पुणे शहरातील विविध बँकातील सुमारे १०० महिला सहकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात नृत्य, गायन तसेच प्रबोधनात्मक नाटिका अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी झाली.
मुख्य अतिथी सायबर कायदा तज्ञ श्रीमती जयश्री नांगरे यांनी सायबर सुरक्षा विषयावर मार्गदर्शन करताना सायबर फसवणुकीचे प्रकार कसे घडतात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
दुसऱ्या प्रमुख अतिथी पत्रकार व लेखिका श्रीमती हीना कौसर खान यांनी संवादात्मक शैलीत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी दैनंदिन जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन नवीन संधी शोधण्याचा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला दृक्-श्राव्य व शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या NAWPC संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल देशमुख व त्यांच्या पत्नी देवता यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन महिला सहकाऱ्यांनी किमान ₹५०० प्रमाणे स्वेच्छेने देणगी दिली. तसेच बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन, पुणे युनिटने संस्थेला ₹१०,००० ची मदत दिली. कार्यक्रमाच्या शेवटी निबंध व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
महिला सक्षमीकरण आणि जागरूकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन कॉ. स्वेता येलदी व कॉ. नीता घाग, महिला पदाधिकारी यांनी केले व सूत्रसंचालन मोनिषा पॉल यांनी केले.


