पुणे, १६ मार्च २०२६ :
मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जपणुकीसाठी कार्यरत ‘मराठी माझा अभिमान, असोसिएशन विमाननगर’ या संस्थेच्या वतीने यंदा प्रथमच सामूहिक गुढी उभारणीचा देखणा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी, मराठी नववर्षाचे स्वागत सर्वांनी एकत्र येऊन करण्याचा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे.
मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार हा ध्यास समोर ठेवून स्वर्गीय मीनल देशमुख यांनी २१ जून २०२४ रोजी ‘मराठी माझा अभिमान असोसिएशन, विमाननगर’ या संस्थेची स्थापना केली. संस्था स्थापनेपासूनच संस्था अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजात मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे कार्य करत आहे.
या कार्यक्रमात लहान, थोर सर्व सहभागी असतात त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे.अशा कार्यक्रमांद्वारे विमाननगर व परिसरातील मराठी बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य संस्था करत आहे.
नुकत्याच झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संस्थेने उघडलेल्या ” मराठी भाषा गौरव संध्या” या विशेष दालनात स्वरचित कविता, एकपात्री प्रयोग आणि मराठी भाषे बद्दल मनोगत असे विविध सादरीकरणातून मराठीचा गौरव उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या पुढाकारातून ढोल-ताशा, शंखनाद, लेझीम अशा पारंपरिक कलांचे प्रशिक्षण वर्ग सुरू असून त्यातून तरुणाई आणि लहान मुले मराठी लोककलांशी जवळून जोडली जात आहेत.
संस्थेच्या उपक्रमांचा अजून नवा विस्तार म्हणजे सामूहिक गुढी उभारणीचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत दत्त मंदिर चौक, विमाननगर येथे पार पडणार आहे.
सकाळच्या गुढी उभारणीनंतर दुपारपासून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि विविध नववर्षसूचक प्रतीकांसह ही शोभायात्रा निघणार असून संपूर्ण विमाननगर मराठी नववर्षाच्या स्वागत उत्साहाने करणार आहे.
या सर्व उपक्रमांच्या यशामागे स्नेहा सांडभोर, अनिता लोखंडे, रेखा वाबळे , वृषाली मिरजगावकर, मुक्ताताई जगताप, अॅड. नीलिमा चव्हाण, अश्विनी देसाई या संस्थेच्या कार्यकारिणी सभासदांचा हातभार मोलाचा आहे. सर्व कार्यकारणी सदस्यांचे नियोजन, परिश्रम आणि सांघिक समन्वय यामुळे प्रत्येक कार्यक्रम सुरळीत पार पडत असून त्यांचे योगदान खरोखरच अमूल्य मानले जाते.
सदर संस्थेला विमान नगर मधील अनेक रहिवाशी संस्था सदस्य होऊन आणि कार्यक्रमात सहभाग नोंदवून संस्थेचा उद्देश साध्य करत आहेत.हेच संस्थे
चे खरे यश आहे.


