पुणे, दि. १८ मार्च (जिमाका वृत्तसेवा) – बारामती विधानसभा मतदारसंघ (२०१) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक उपनिवडणूक अधिकारी मिनळ कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने विविध विभागांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पडावी यासाठी आवश्यक नियोजन, मनुष्यबळाची उपलब्धता, साहित्य वितरण, प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी मतदान केंद्रांची तयारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी,एमसीएमसी आणि माध्यम कक्ष कामकाज, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच मतदार जागृती उपक्रम (SVEEP) प्रभावीपणे राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश उपनिवडणूक अधिकारी कळसकर यांनी दिले.
बैठकीस विविध विभागांचे नोडल अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


