पुणे,14 एप्रिल २०२६ : पुण्यातील केईएम हॉस्पिटल येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रिदम अँड रुटीन लिविंग विथ पार्किन्सन्स डिसीज या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात रुग्ण सपोर्ट ग्रुपच्या सुमारे 100 सदस्यांनी नृत्य-गायनाच्या सादरीकरणाद्वारे (क्रिएटिव्ह थेरपी) जनजागृती केली.यामध्ये पार्किन्सन्स आजारासह जगणाऱ्या लोकांचा दैनंदिन दिनक्रम, दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी आणि या अडचणी कमी करण्यासाठी सोपे आणि व्यावहारिक उपाय या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी रूग्णांनी सपोर्ट ग्रुपबरोबर जोडले गेल्यानंतरचा अनुभव व त्यातून झालेला जीवनातील बदलाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
पार्किन्सन डिसीज सपोर्ट ग्रुप प्रोग्राम हा बीकेपी-पीडीएमडीएसच्या माध्यमातून भारतातील अनेक केंद्राद्वारे विनामूल्य चालविला जातो. हा बहुआयामी स्वरूपातील कार्यक्रम असून यामध्येे प्रामुख्याने ऑक्युपेशनल व स्पीच थेरपी, शारीरिक व्यायाम (फ़िजिओथेरपी), लाफ्टर थेरपी, डान्स आणि म्युझिक,मूव्हमेंट थेरपी याबरोबरच योग्य पोषक आहार, योग-प्राणायाम, जेष्ठ नागरिकांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या इतर मेंदूविषयक आजारांवरील डॉक्टरांची व्याख्याने आणि जागरूकता सत्रांद्वारे योग्य ते मार्गदर्शन करण्यात येते. हे उपक्रम बीकेपी – पीडीएमडीएसच्या प्रशिक्षित व्यक्तींद्वारे विनामूल्य आयोजित केले जातात.पुण्यात हा उपक्रम केईएम हॉस्पिटल व दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या पेशंट सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून चालविला जातो.
याप्रसंगी केईएम हॉस्पिटल पुणे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया, मुख्य कामकाज अधिकारी डॉ.राकेश शहा, केईएम हॉस्पिटलमधील मेंदूविकारतज्ञ डॉ.विशाल देशपांडे, केईएम व डीएमएच सपोर्ट ग्रुपच्या फिजिओथेरपिस्ट व समन्वयक डॉ.निकिता छाजेड आणि वॉलेंटिअर संपदा पाध्ये,बीकेपी – पीडीएमएसच्या कविता निंबाळकर,डीएमडीएस टीम मधील डॉ.अंजुम तडवी, डीएमएच टीम सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्किन्सन मध्ये कालांतराने वाढत जाणाऱ्या या विकारामध्ये मज्जासंस्था आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो. याबाबतची लक्षणे वयोमानानुसार वाढत जातात,ज्यामध्ये मुख्यत्वे शरीरामध्ये कंप निर्माण होणे, हालचाल मंदावणे, शारीरिक संतुलन बिघडणे, चालताना तोल सांभाळता न येणे, शरीर घट्ट होणे (फ्रीझिंग),स्नायू कडक होणे,बोलण्यात बदल होणे इत्यादींचा समावेश असतो. हालचालींवर झालेला परिणाम आणि इतर लक्षणांमुळे रूग्णाच्या आत्मविश्वासावर प्रभाव पडतो आणि मानसिक व भावनिकदृष्ट्या प्रभाव पडू शकतो. अशा वेळी नियमित औषधोपचारांबरोबरच गरज भासते ती सपोर्ट ग्रुपची! हे सपोर्ट ग्रुप प्रोग्राम्स फक्त रूग्णांसाठीच नव्हे तर त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी देखील आहेत.
मेंदूविकारतज्ञ डॉ.विशाल देशपांडे म्हणाले की, पार्किन्सन आजार हा रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती यांसाठी अत्यंत गुंतागुंतीची समस्या असते. या आजारामुळे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबाची जीवनशैली,दैनंदिन कामकाज बदलते. परंतु भीती न बाळगता योग्य वैद्यकीय उपचार, मानसिक आधार,शारीरिक व्यायाम,विविध थेरपी घेऊन या आजारावर मात कशी करता येईल यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
केईएम हॉस्पिटल पुणे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया म्हणाल्या की,पार्किन्सन असणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोजच्या आयुष्यात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याची मला जाणीव आहे. माझ्या मते औषधोपचार आणि फिजिओथेरपी यांव्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हालचाल आणि लय (रिदम) हा आहे. तसेच पार्किन्सनसोबत जगणारे रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत. पार्किन्सनसोबत जगणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या काळजीवाहकांना योग्य आधार आणि मदत मिळावी, या उद्देशाने आम्ही विविध उपक्रम राबवत असतो.पार्किन्सन असलेल्या व्यक्तींचे जीवनमान अधिक चांगले, उत्साही आणि नियमित राहावे, तसेच त्यांना दैनंदिन कामे शक्य तितकी सुरू ठेवता यावीत, यासाठी आम्ही अनेक नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्यसेवा प्रदान करणारे रुग्णालय म्हणून तुमचे जीवन अधिक सोपे आणि चांगले करण्यासाठी नक्कीच मदत होईल, असा मला विश्वास आहे. .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.निकिता छाजेड यांनी केले.


