Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedएडीवायपीयूमध्ये स्टार्टअप्सचा जल्लोष, विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळाले उद्योगविश्वाचे व्यासपीठ

एडीवायपीयूमध्ये स्टार्टअप्सचा जल्लोष, विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळाले उद्योगविश्वाचे व्यासपीठ

 

 

 

पुणे : अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठात विद्यार्थ्यांमधील उद्योजकता आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी नव्या इन्क्युबेटरची सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवस चाललेल्या ‘पिच-इट’ बिझनेस आयडिया स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वास्तवातील समस्यांवर आधारित स्टार्टअप कल्पना सादर करत उद्योगविश्वाचे लक्ष वेधून घेतले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत १३ संघांनी आपापल्या व्यावसायिक संकल्पना मांडल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, आत्मविश्वास आणि समस्यांवर उपाय शोधण्याच्या दृष्टिकोनाने परीक्षक प्रभावित झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली स्टार्टअप संस्कृती अधोरेखित झाली.

स्पर्धेत ‘स्टुडंटएक्सचेंज’ या स्टार्टअपने प्रथम क्रमांक पटकावत ३० हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले. या संघाचे नेतृत्व हृषिकेश वल्लकाटी, गौतम बेनूरकर आणि अय्याज खरबरी यांनी केले. तर श्रेयश सिंह यांच्या नेतृत्वाखालील ‘अर्था माइंड एआय’ या स्टार्टअपने उपविजेतेपद पटकावत २० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.

एडीवायपीयू इन्क्युबेटरच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन यावेळी झाले. हे संकेतस्थळ पूर्णपणे स्कूल ऑफ डिझाईनमधील विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. इन्क्युबेटरचा लोगो ईश पाटील यांनी तयार केला आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक अभ्यासापुरते मर्यादित न राहता स्टार्टअप, नवकल्पना आणि उद्योजकीय संधी निर्माण कराव्यात या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा इन्क्युबेटर डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्या दूरदृष्टीतून साकारण्यात आला आहे.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन यांनी विद्यार्थ्यांना फॉलोअर्स नव्हे तर क्रिएटर्स बनाअसा संदेश दिला. इनोव्हेशन प्रमुख स्नेहा मेहता यांनी विद्यार्थ्यांना धाडसाने स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले. स्कूल ऑफ डिझाईनच्या अधिष्ठाता अपर्णा म्हेत्रास यांनी विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता या स्पर्धेतून स्पष्ट झाल्याचे सांगितले.

उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. शादी डॉट कॉमच्या माजी यूके कंट्री हेड गीता श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि सादरीकरणाची गुणवत्ता इतकी उत्कृष्ट होती की परीक्षक म्हणून निर्णय घेणे कठीण झाले, असे नमूद केले. कॉग्निफएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि फ्युचर्ड इनोव्हेशन स्टुडिओजचे संस्थापक मनीष मल्होत्रा यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि नवकल्पनांचे कौतुक केले.

या स्पर्धेसाठी विवेक खरे, मधुप अग्रवाल, शैलेश दयाल, गीता श्रीवास्तव आणि मनीष मल्होत्रा यांच्यासह अनेक उद्योगतज्ज्ञ परीक्षक म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे, अनेक परीक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवत विद्यापीठाच्या स्टार्टअप आणि इनोव्हेशन परिसंस्थेला आणखी बळकटी देण्याची भूमिका घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments