शशी कपूर आणि नंदा हे लोकप्रिय कलावंत `चार दिवारी’ (१९६१), `मेहंदी लगी मेरे हाथ’ (१९६२), `मोहब्बत इसको कहते हैं’ व `जब जब फूल खिले’ (१९६५), `नींद हमारी ख्वाब तुम्हारे’ (१९६६), `जुआरी’ (१९६८), `राजा साब’ (१९६९) आणि `रूठा ना करो’ (१९७०) या आठ चित्रपटांत नायक-नायिका होते. यापैकी `जब जब फूल खिले’चे दिग्दर्शन सूरज प्रकाश यांनी केले होते. त्यात आगा, शम्मी, कमल कपूर, टुन टुन आदी सहकलाकार होते. गीतकार आनंद बक्षी यांनी गीते लिहिली होती आणि संगीताचा साज संगीतकारबंधू कल्याणजी-आनंदजी यांनी चढविला होता. आनंद बक्षी यांची गीतलेखनाची नांदी या चित्रपटापासूनच झाली. या चित्रपटाचे पटकथाकार ब्रिज कट्याल यांची ही पटकथा जी. पी. सिप्पी यांच्यासह तीन बड्या निर्मात्यांनी नाकारली होती. पण दिग्दर्शक सूरज प्रकाश यांनी ती स्वीकारली आणि चित्रपट कमालीचा यशस्वी झाला.
हा चित्रपट किती आठवडे चालेल यावर सूरज प्रकाश आणि शशी कपूर यांच्यांत पैज लागली. प्रकाश यांचे म्हणणे २५ आठवडे तर शशी कपूर यांचे म्हणणे ८ आठवडे चालेल. शेवटी असे ठरले, की जो जिंकेल त्याने दुसऱ्याला बर्लिंगटनमधे शिवलेला सूट भेट द्यायचा ! प्रकाश जिंकले आणि शशी कपूरना सूट मिळाला. पण प्रत्यक्षात दोघेही चुकीचे ठरले ; कारण चित्रपट तब्बल ५० आठवडे चालला.
या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे परदेशातून परतलेल्या रीटा खन्नाला (नंदा) मनाचा शीण घालविण्यासाठी कोठेतरी रम्य ठिकाणी जायचे असते. ती काश्मीरमधे येते आणि राजा नामक (शशी कपूर) तरुणाकडून त्याची हाऊसबोट भाड्याने घेते. प्रारंभीच्या गैरसमजांनंतर ते एकमेकांकडे आकृष्ट होतात. रीटाचे वडील राज बहादूर चुनिलाल (कमल कपूर) यांना हे पसंत नसते. तिने किशोरशी (जतिन खान) विवाह करावा असे त्यांना वाटत असते पण रीटाचे राजावरच प्रेम असते. कावेबाज राज बहादूर एक बेत आखतो. काय असतो तो बेत ? तो तडीला जातो का, हे चित्रपटाच्या अखेरीस पाहावयास मिळते.
या चित्रपटातील “ये समा समा है ये प्यार का” हे लता मंगेशकर यांनी गायिलेले गीत रीटावर (नंदा) चित्रित झाले आहे. प्रियकराच्या दर्शनासाठी उतावीळ झालेल्या नायिकेच्या मनात घालमेल चालली आहे. हे प्रेमाने भरलेले वातावरण कोणाची तरी प्रतीक्षा करायला लावणारे आहे. हा बहर माझे मनच चोरून नेईल असे वाटत आहे. कोणीतरी आपल्या चक्षूंनी खुणावत बोलावीत आहे, अशी स्वप्ने पडत आहेत. कोणा प्रिय व्यक्तीचे दर्शन व्हावे असे हे वातावरण आहे, हे नायिकेचे मनोगत आनंद बक्षी यांनी खुलवून शब्दबद्ध केले आहे. कल्याणजी-आनंदजी यांची चाल गोड आणि तरल आहे. तीत त्यांनी गिटार, बोंगो, ग्रुप व्हायोलिन व पिआनो अकॉर्डिअन या वाद्यांचा वापर केला आहे. लता मंगेशकर यांनी ते सोज्वळ चेहऱ्याच्या नंदा यांना डोळ्यांपुढे ठेवून गायिले असल्याने मनाला अधिक भावते. या गीताच्या ओळी पुढीलप्रमाणे :
ये समा समा है ये प्यार का
किसी के इंतजार का
दिल न चुरा ले कहीं मेरा
मौसम बहार का
बसने लगे आंखों में कुछ ऐसे सपने
कोई बुलाए जैसे नैनों से अपने
ये समा समा है दीदार का
मिल के खयालों में ही अपने बलम से
नींद गवाई अपनी मैंने कसम से
ये समा समा है खुमार का
मैं तो हूं सपनों के राजा की रानी
सच हो न जाए ये झूठी कहानी
ये समा समा है इकरार का
अनिल रा. तोरणे
(भ्रमण : ९२२६१६०६५४)


