पुणे दिनांक १४ मे २०२६
एच२ई पॉवर सिस्टिम पुरस्कृत महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा दिनांक १५ ते १७ मे या कालावधीत पुण्यात आयोजित केली जाणार आहे. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात दोनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून मुलींमध्ये शंभर प्रवेशिका आल्या आहेत.
पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या वतीने, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि फीडे यांच्या अधिपत्याखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक सहभागाची नोंद ठरली आहे. मुलांच्या गटातील स्पर्धा गणेश सभागृह कर्वे रोड येथे होणार असून मुलींच्या गटातील लढती अश्वमेध सभागृह कर्वे रोड येथे आयोजित केल्या जाणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन १५ मे रोजी सकाळी नऊ वाजता गणेश सभागृह येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध देशपांडे व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. सिद्धार्थ मयूर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्पर्धा आठ फेऱ्यांच्या क्लासिकल पद्धतीने खेळविली जाणार असून प्रत्येक खेळाडूस ६० मिनिटे तसेच पहिल्या चालीपासून प्रत्येक चालीमागे ३० सेकंद वाढीव वेळ दिला जाणार आहे. खुल्या गटात एफएम वीरेश शरणार्थी (पुणे) हा 2340 रेटिंगसह अव्वल मानांकित खेळाडू आहे. त्याच्या पाठोपाठ मानस गायकवाड (सोलापूर) 2171, राम परब (मुंबई उपनगर) 2082, अथर्व सोनी (ठाणे) 1971 आणि भुवन सुहास शितोळे (पुणे) 1915 रेटिंगसह सहभागी आहेत.
मुलींच्या गटात श्रेया जी हिप्परगी (सांगली) ही 1906 रेटिंगसह अव्वल मानांकित खेळाडू आहे. तिच्या बरोबरच पाठोपाठ श्रद्धा बजाज (नागपूर) 1850, श्रावणी उंडाळे (पुणे) 1803, भूमिका वाघले (छत्रपती संभाजीनगर) 1751 आणि ईश्वरी जगदाळे (सांगली) 1724 रेटिंग या खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे.
या स्पर्धेतील दोन्ही गटात पहिले पाच क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे सात हजार, चार हजार, तीन हजार सहाशे, तीन हजार, दोन हजार रुपये अशी पारितोषिक दिली जाणार असून दहाव्या क्रमांकापर्यंत रोख पारितोषिके मिळणार आहेत.
या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच अथर्व गोडबोले हे मुख्य पंच म्हणून काम पाहणार असून आंतरराष्ट्रीय पंच मिताला शेणवी या उपमुख्य पंच म्हणून कार्यरत आहेत. स्पर्धेचे संचालक म्हणून प्रकाश कुंटे हे जबाबदारी सांभाळत आहेत.
ही स्पर्धा आगामी राष्ट्रीय १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा म्हणून महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रीय स्पर्धा पश्चिम बंगाल येथे २७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. खुल्या गटातील अव्वल चार आणि मुलींच्या गटातील अव्वल चार खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
करतील.


