Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय मजदूर संघाची मागणी : पुण्यातील ईएसआय हॉस्पिटल सर्व सुविधांसह त्वरित सुरू...

भारतीय मजदूर संघाची मागणी : पुण्यातील ईएसआय हॉस्पिटल सर्व सुविधांसह त्वरित सुरू करावे

 

पुणे – महाराष्ट्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कर्मचारी राज्य विमा योजना (ESI) अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाने केले असून, पुण्यातील बिबवेवाडी येथील ईएसआय हॉस्पिटल सर्व अत्याधुनिक सुविधांसह त्वरित पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

दि. 12 मे 2026 रोजी मंत्रालय, मुंबई येथे मा. कामगार मंत्री तसेच मा. आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील ईएसआय योजनेंतर्गत विविध प्रलंबित प्रश्न, रुग्णालयीन सुविधा, कामगारांच्या आरोग्यविषयक अडचणी, योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांचे कव्हरेज आणि सेवा विस्तार याबाबत सविस्तर बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये राज्यातील ईएसआय सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि कामगाराभिमुख करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

त्यानंतर दि. 15 मे 2026 रोजी कर्मचारी राज्य विमा महामंडळ, बिबवेवाडी, पुणे येथे ईएसआय हॉस्पिटलच्या कामकाजाचा विशेष आढावा घेण्यात आला. यावेळी ईएसआय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. प्रदीप गायकवाड यांनी जुलै 2026 पूर्वी सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असे 220 बेडचे ईएसआय हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने रुग्णांच्या सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिली.

तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती येथे 100 बेडचे, सातारा जिल्ह्यातील शिरवळ (ता. खंडाळा) येथे 100 बेडचे तसेच चाकण एमआयडीसी (ता. खेड) येथे 300 बेड क्षमतेचे अत्याधुनिक ईएसआय हॉस्पिटल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या कामगारांसाठी ही रुग्णालये अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

भारतीय मजदूर संघाने या सर्व प्रस्तावित व प्रगतिपथावरील ईएसआय हॉस्पिटल्सचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून ती त्वरित पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावीत, अशी ठाम मागणी केली आहे. राज्यातील लाखो कामगार व त्यांच्या कुटुंबियांना परवडणाऱ्या व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी असल्याचे संघटनेने नमूद केले.

यासोबतच ईएसआय योजनेंतर्गत विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. योजनांचे लाभ अधिकाधिक सभासद व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः असंघटित, ठेका व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना ईएसआय योजनांची माहिती, नोंदणी प्रक्रिया, वैद्यकीय सुविधा आणि लाभांविषयी जागरूक करण्यावर भर देण्यात येणार आहे.

भारतीय मजदूर संघाने बैठकीमध्ये 40 वर्षांवरील ईएसआय सभासदांसाठी नियमित मेडिकल चेकअप, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, जीवनशैलीशी संबंधित आजारांचे निदान, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कर्करोगपूर्व लक्षणे, पौष्टिक कमतरता यांचे वेळेत निदान तसेच आरोग्य जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. वाढत्या औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.

या बैठकीमध्ये भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे उपस्थित होते. तसेच डीन डॉ. प्रदीप गायकवाड, चिकित्सा अधीक्षक डॉ. विभूती आंबवडे, सहाय्यक चिकित्सा अधीक्षक डॉ. निना, उपनिदेशक अनंत कुमार वर्मा, प्रतिनिधी भानुदास रसाळ, सहाय्यक अभियंता श्री. लाल, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक श्रीमती देशमुख तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीस उपस्थित भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण तसेच अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी राज्यातील सर्व ईएसआय सभासदांनी योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments