Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedउल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत १७ मार्च रोजी मूल्यमापन चाचणी परीक्षा*

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत १७ मार्च रोजी मूल्यमापन चाचणी परीक्षा*

*

पुणे, दि. १५ :केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये १७ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून ते सायं. ५ वाजेपर्यंत असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

उल्लास ॲपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उल्लास अॅपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेल्यांनाच ही परीक्षा देता येईल. नोंदणी केलेल्या व्यक्तींनी रविवार १७ मार्च रोजी संबंधित शाळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत.

परीक्षेच्या वेळी असाक्षर व्यक्तीने स्वतःचे एक ओळखपत्र आकाराचे छायाचित्र सोबत ठेवावे. छायाचित्र नसल्यास सक्ती करण्यात येणार नाही. जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचे स्वतःचे मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवावे. प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण १५० गुणांची आहे. अनुक्रमे भाग क (वाचन) ५० गुण, भाग ख (लेखन) ५० गुण, भाग ग (संख्याज्ञान) ५० गुण. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता येतील. परंतू तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत.

परीक्षेची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी ३ तासांचा असेल. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ देण्यात येईल. परीक्षेचे माध्यम मराठी असेल. अपवादत्त्मक परीक्षा केंद्रांवर इतर माध्यमांचे परीक्षार्थी आल्यास त्याबाबतची व्यवस्था जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) यांचेकडून करण्यात येईल.

उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेला पेन वापरु नये. उल्लास ॲपवर ऑनलाईन नोंदणी केलेली नसल्यास परीक्षा देता येणार नाही.

असाक्षर व्यक्तींची नोंदणी ज्या प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेमध्ये करण्यात आलेली आहे, ती प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असणार आहे व तेथील मुख्याध्यापक हे केंद्र संचालक असणार आहेत. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये सुमारे १ हजार ५०० परीक्षा केंद्रांवर सुमारे ११ हजार असाक्षर व्यक्ती ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या असाक्षर व्यक्तींना केंद्र सरकार मार्फत उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी प्रशासनाने सर्व व्यवस्था केलेली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी, गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करावा. सर्व असाक्षर व्यक्तींनी सदर पायाभूत परीक्षा देऊन प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments