*’
पुणे, दि. १५ : खाजगीक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच शासकीय कार्यालये व विभागामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना ‘बीएच’ मालिकेतील नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी जारी केलेल्या नियमावलीनुसार नोंदणीची कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
परिवहन आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार ‘बीएच’ मालिकेतील नोंदणी चिन्हासाठी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारास नमूना ६० मध्ये कार्यरत प्रमाणपत्र व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अर्जदारास कार्यालयीन ओळखपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. नमूना ६० नुसार अर्ज करणाऱ्या अर्जदारास काम करीत असलेल्या संस्था किंवा कंपनीचे राज्यात किंवा संघराज्य क्षेत्रात किमान ४ किंवा त्यापेक्षा जास्त कार्यालये असणे आवश्यक आहे. अर्जदारास नियम ४८ मधील तरतुदीनुसार ‘बीएच’ मालिकेतील नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करणे ऐच्छिक असणार आहे.
संस्थेची किंवा शासकीय कार्यालयाची भारतातील विविध राज्यांमध्ये कार्यालये असण्याचा दावा करणाऱ्या खाजगी संस्थेतील तथा शासकीय वाहनधारकांकडून मागील कार्यकाळात त्याचा विविध राज्यातील वास्तव्याचा दाखला तसेच मागील कार्यकाळातील वेतन चिठ्ठी प्राप्त केली जाईल. तसेच अर्ज करण्यापूर्वी वाहनधारक सद्यस्थितीत ज्या विभागात, कंपनीत कार्यरत आहे, त्याच विभागात, कंपनीमध्ये तो यापुर्वी इतर राज्यात कार्यरत होता का याची तपासणी करूनच त्याचे वाहन ‘बीएच’ मालिकेमध्ये नोंदणीसाठी ग्राह्य धरण्यात येईल. बीएच सिरिजचा लाभ प्रति व्यक्ती फक्त एका वाहनासाठीच देण्यात यावा.
बीएच मालिकेसाठी अर्ज केलेल्या वाहन मालकाने स्वतःच्या बँक खात्यातून वाहन खरेदीसाठी खरेदी रक्कम अदा केली असल्याबाबत किंवा कर्ज प्रकरण असल्यास वित्तदात्याने अर्जदाराच्या नावाने वाहन वितरकास खरेदी रक्कम अदा केली असल्याबाबतचा पुरावा तपासण्यात येईल. अर्जदारांनी ही माहिती सादर न केल्यास किंवा सादर केलेल्या पुराव्यात विसंगती आढळल्यास त्याचा अर्ज नाकारण्यात येईल.
लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची चारचाकी वाहने तसेच २ लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची दुचाकी वाहने बीएच मालिका नोंदणीसाठी आल्यास अशा वाहनधारकांचे आयकर विवरण किंवा बँक खात्याचे विवरणपत्र तपासले जाईल. वाहनधारकाची खरोखर वाहन खरेदी करण्याची आर्थिक क्षमता आहे किंवा नाही हे पाहून नोंदणीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. भारतीय सुरक्षा दलातील वाहनधारकांच्या वाहनांचे बीएच मालिकामध्ये नोंदणी करतांना त्यांचे फक्त सुरक्षा दलाचे ओळखपत्र घ्यावे, त्यांच्याकडे इतर कागदपत्राची मागणी, तपासणी करता येणार नाही.
बीएच मालिकेमध्ये नोंदणी केलेल्या व नोंदणी कालावधी दोन वर्षापेक्षा जास्त झालेल्या वाहनधारकांनी पुढील कालावधीसाठीचा कर भरणा केलेला आहे किंवा नाही ते तपासण्यात येईल. पुढील कालावधीचा कर भरलेला नसल्यास अशा वाहनधारकांना मागणी पत्र पाठविले जाईल. तसेच कर न भरलेल्या वाहनधारकांवर मुंबई मोटार वाहन कर कायदा, १९५८ मधील कलम १२(बी) व केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५१(ब) अन्वये कर वसुलीबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.


