पुणे, दि. १९ मार्च : “फेल फास्ट’ हे स्टार्टअप मधील सर्वात महत्वाचे सूत्र विद्यार्थ्यांनी समजून त्यातून लवकर बाहेर पडावे. तेव्हाच स्टार्टअपमध्ये प्रगती करता येईल. विकसीत तंत्रज्ञानामुळेच स्वप्नांना सत्यात उतरविण्याची दिशा युवकांना मिळत आहे.” असे विचार गोदरेज अँड बॉयस एमएफजी कंपनी, लि.चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यावसायीक प्रमुख पुष्कर गोखले यांनी व्यक्त केले.
इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ‘हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२४ चे उद्घाटन युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.(सिस्टम आणि ऑपरेशन्स) चे संचालक विनोद अग्रवाल व एक्झ्यूकेटीव्ह कॉन्सीलिंग लिडर उमेश कौल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. कृष्णा वर्हाडे, डॉ. कृष्णप्रसाद गुणाले व विद्यार्थी निल बाफना उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर आधारित ‘हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
पुष्कर गोखले म्हणाले,” हॅकेथॉन स्पर्धेमुळे कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. सध्याच्या रीलच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वःताचा वेळ न घालविता त्यापासून परावृत्त व्हावे. येणारी पिढी प्रगत असते त्यांच्यावर बदलत्या काळाचा प्रभाव असतो. याच बदलामुळे माणूस अधिक स्मार्ट होत आहे. १९८० च्या दशकात भारताला अपयशी देश म्हणून गणले जात होते. परंतू तंत्रज्ञानामुळे आता प्रगतीपथावर आहे. स्टार्टअप आणि इनोव्हेशनमुळे आज संपूर्ण जगातील महत्वाच्या कंपन्यांचे सीईओ भारतीय वंशाचे आहेत.”
विनोद अग्रवाल म्हणाले,” ऑक्सफर्ड ऑफ इस्ट म्हणून संबोधल्या जाणार्या पुण्यात ज्ञानाची परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी आव्हानांना तोंड देत पुढे जावे. एमआयटी डब्ल्यूपीयूने आयोजित केलेले हॅकेथॉन विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. कोणतेही कार्य करतांना कल्पना ही सर्वात महत्वाची असून त्यावर संशोधन करावे. ”
उमेश कौल म्हणाले,” देशात विविध मंत्रालयातून अनेक विषयांवरील समस्यांचे समाधान करावे लागते. अशावेळेस स्टार्टअपसाठी ही मोठी संधी आहे. आधुनिक युगात एआय, सिस्टीम ऑर्गनायझेशन, रोबोटिक सर्जरी, ऑटोमेशन, सायबर सिक्यूरिटी सारख्या क्षेत्रात करियर करता येते. केवळ त्याला कल्पकतेची व साकार करण्याची क्षमता हवी.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,”हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू मधून नवे उद्योजक निर्माण होऊन देश प्रगतीपथावर जाईल. यातून सृजनात्मकता समोर येऊन विद्यार्थी स्वःताचे स्टार्टअप सुरू करू शकतील. या देशात नारायण मुर्ती, अजीम प्रेमजी यांनी काळानुसार पावले बदलत आणि स्वतःच्या व्यवसायाला जागतिक स्तरावर पोहचविले. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पना साकार करून त्याला मुर्तरूप दयावयाचे आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,” माइंड टू मार्केट आणि पेपर टू प्रोडक्ट ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे खूप महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्यांना चालना दयावी व त्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करून त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षात आणण्याच्या हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी याची मदत होणार आहे. ”
विद्यार्थी पियूष मोटवाणी आणि रिद्धी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कृष्णा वर्हाडे यांनी आभार मानले.
स्टार्टअप मधील ‘फेल फास्ट’ संकल्पना समजून घ्यावी पुष्कर गोखले यांचे विचारः हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू २०२४ चे उद्घाटन
RELATED ARTICLES


