पुणे – ब्रुनो हा पुण्यातील एक 9 वर्षांचा लॅब्राडॉर प्रजातीचा कुत्रा असून त्याला अनेक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागत असून मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड, हृदयाची गती वाढणे, हिप डिसप्लेसिया आणि थायरॉईड सारख्या समस्यांचा समावेश आहे. किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या ब्रुनोला डायलिसिस करावे लागत असून त्याची ही समस्या कायमची सोडवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
स्मॅाल ॲनिमल क्लिनीकचे डॅा नरेंद्र परदेशी सांगतात की आम्ही या कुत्र्यावर प्रत्यारोपणासाठी दात्याच्या प्रतिक्षे आहोत. लवकरात लवकर आमच्या ब्रुनोकरिता किडनी दाता उपलब्ध होईल अशी आशा ब्रुनोचे पालक अनुत्तमा नायकवडी यांनी व्यक्त केली.
कॅनाइन किडनी प्रत्यारोपण जेव्हा किडनी निकामी होते, तेव्हा कुत्र्यांना विषारी पदार्थ बाहेर टाकणे, अशक्तपणा आणि शारीरीक असंतुलनाचा त्रास होतो. याकरिता निवडक पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये एक विशेष प्रक्रिया केली जाते. किडनी प्रत्यारोपणासाठी प्राप्तकर्ता आणि दाता अशा दोन्ही कुत्र्यांची सुसंगतता आणि त्यांना असलेल्या रोगांची कसून तपासणी केली जाते. प्राप्तकर्त्याला शस्त्रक्रियेपूर्वी मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी रक्त संक्रमणासारख्या प्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. या शस्त्रक्रियेनंतरची आयुष्यभर इम्युनोसप्रेसिव्ह औषधे घेणे आवश्यक आहे.
याठिकाणी कुत्र्यांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेतील मुख्य आव्हान म्हणजे दात्याचा शोध घेणे. मानवांमध्ये सामान्यतः दोन किंवा तीन रक्तगट असतात, तर कुत्र्यांमध्ये 15 पेक्षा जास्त रक्तगट आढळून येतात. यामुळे दाता आणि प्राप्तकर्ता यांच्या रक्तगटांमध्ये सुसंगतता सुनिश्चित करणे अधिक आव्हानात्मक होते. नव्याने प्रत्यारोपित केलेल्या अवयवाची कार्यक्षमता राखणे हे देखील एक मोठे आव्हान आहे.
कॅनाइन किडनी प्रत्यारोपणाकरिता आवश्यक बाबी कोणत्या?
– दाता शक्यतो लॅब्राडोर असावा
– वय दोन ते सहा वर्षांच्या दरम्यान असावे.
– मागील सहा महिन्यांत लसीकरण झालेले आणि तापासारख्या कोणत्याही संसर्गाच्या वैद्यकिय इतिहास नसावा.
– अवयव नाकारण्याची शक्यता कमी करण्यासाठी रक्तगट आणि किडनी प्रोफाइल सारख्या महत्त्वाच्या क्लिनिकल पॅरामीटर्स जुळणे आवश्यक आहे.
या ठिकाणी या सर्व आवश्यक बाबींची खबरदारी घेत योग्य दाता शोधून ब्रुनोवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले जाणार आहे. जोपर्यंत त्याचे शरीर सुरक्षितपणे नवीन किडनी स्वीकारत नाही, तोपर्यंत ब्रुनोला सुमारे सहा महिने इम्युनो-सप्रेसेंट्सवर ठेवले जाणार आहे.


