Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय दर्शनशास्त्रातील विश्लेषणात्मक दृष्टीकोन अंगिकारा* *डायनॅमिक भारत २०४७...

भारतीय दर्शनशास्त्रातील विश्लेषणात्मक दृष्टीकोन अंगिकारा* *डायनॅमिक भारत २०४७ साकारण्यासाठी काॅपी – पेस्ट मधून बाहेर पडा*

 

 

*प्राचीन इतिहास संशोधक नीलेश ओक यांचे प्रतिपादन*

 

*नागरीक सोशल फाऊंडेशन आयोजित विशेष व्याख्यान*

 

पुणे – पाश्चात्त्यांनी बिंबवलेल्या कालखंडाहूनही भारतीय उपखंडाचा इतिहास व संस्कृती प्राचीन आहे. आपल्या वेद, उपनिषदे, दर्शने तसेच महाकाव्यांतून मिळणारे खगोलशास्त्रीय पुरावे, त्यातील नेमकेपणा, प्रगत नौकानयन आणि समृद्ध कृषीक्षेत्र, याद्वारा प्राचीन भारतीय उपखंडाची समृद्धी अधोरेखित होते. दर्शनशास्त्रांत सांगितलेला वैज्ञानिक तसेच विश्लेषणात्मक दृष्टीकोन स्वीकारला, तर डायनॅमिक भारत २०४७ नक्कीच दृष्टीपथात येईल, असे प्रतिपादन प्राचीन भारतीय इतिहास संशोधक नीलेश ओक यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. पाश्चात्त्यांचे तेवढे सगळे उत्तम, विज्ञानसिद्ध हे मानणारी काॅपी – पेस्ट पद्धत आपण सोडली पाहिजे आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा मागोवा घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

 

नागरीक सोशल फाऊंडेशनने ॲम्बिशन्स काॅमर्स इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने आयोजित केलेल्या डायनॅमिक भारत २०४७ या विषयावरील विशेष व्याख्यानप्रसंगी ओक बोलत होते. याप्रसंगी ॲम्बिशन्सचे संचालक कौस्तुभ अत्रे, वक्ता विभाग प्रमुख दीपक मेहेंदळे,फाऊंडेशनचे विश्वस्त अमेय सप्रे, संचालक प्रीतम थोरवे, चंद्रशेखर यादव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमापूजनाने आणि पुष्कराज सप्रे यांनी गायिलेल्या वंदेमातरम् प्रार्थनेसह दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.

 

ओक यांनी भारतीय उपखंडाचा प्राचीनतम इतिहास तसेच कालखंडाचा नेमकेपणा, याविषयी पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष अशी मांडणी केली. गतानुगतिक वृत्तीचा त्याग करून, स्वतः अभ्यास करून, पुराव्यांची पडताळणी करून, प्रसंगी पुराव्यांचा शोध घेऊन आपल्या इतिहासाची, संस्कृतीच्या वैशिष्ट्यांची मांडणी तसेच पुनर्मांडणी करणे आवश्यक आहे, असे सांगून ओक म्हणाले, देशाला २०४७ चे स्वप्न साकारायचे असेल, तर पूर्वजांची ज्ञानप्राप्तीची ओढ, जिज्ञासा, विश्लेषणाची शास्त्रशुद्ध पद्धती, चिकित्सक दृष्टीचा समन्वय आधुनिक ज्ञानविज्ञान आणि तंत्रस्नेही अभ्यास, यांची आवश्यकता आहे.

 

ते पुढे म्हणाले, आपले वेद, महाकाव्ये यांचा कालखंड अलीकडचा होता, असे ठसविले जाते. प्रत्यक्षात आपली संस्कृती सर्वांत प्राचीन आहे आणि वेदांमधील नोंदी व उल्लेख, रामायण – महाभारतातील खगोलशास्त्रीय पुरावे, नक्षत्रांचे संदर्भ तपासले तर महाभारत युद्धाचा काळ इसवीसनपूर्व ५५६१ आणि रामायणातील नोंदींनुसार रामरावण युद्धाचा काळ १२ ते १४ हजार वर्षांपूर्वीचा आहे, हे सिद्ध होते. वाल्मीकी रामायणातील उल्लेखांनुसार सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्यासाठी वानरपथके पाठवताना जे भूभाग व दिशांचा उल्लेख केला आहे, त्यावरून तत्कालीन भारतीयांना अंटार्टिका, आर्टिक प्रदेश, आल्प्स व अँडीज पर्वतरांगांची नेमकी माहिती होती, हे स्पष्ट होते. ज्ञानसाधनेसाठी संशय हवा, पण तो बुद्धीनिष्ठ असावा. श्रद्धा सात्विक असावी आणि जिज्ञासेला प्रयोजन हवे तरच आधुनिक काळात आपण जागतिक पातळीवर संशोधनाच्या क्षेत्रात योगदान देऊ शकू. हे साध्य करण्यासाठी तरुणाईने गीता, ज्ञानेश्वरीसह भारतीय दर्शनशास्त्रांचा आवर्जून अभ्यास केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

 

स्वागतपर प्रास्ताविक अमेय सप्रे यांनी केले. सई धडफळे यांनी आभार मानले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात प्रश्नोत्तरेही झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments