पुणे, दि. ६ : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास दि. २० जून २०२६ पासून प्रारंभ झाला असून हा कार्यक्रम सुरळीत व प्रभावीपणे राबविण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या मदत कक्षांसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदारांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघ (१९५ ते २०३) जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर आणि भोर या मतदारसंघांसाठी श्रीमती सुरेखा माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ११), जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्कासाठी Toll Free क्रमांक १९५० तसेच sirhelpdeskrural@gmail.com हा ई-मेल उपलब्ध आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र (२०४ ते २०७) मावळ, चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या मतदारसंघांसाठी श्री. सचिन पवार, उपआयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्क क्रमांक ८८८८००६६६६ आणि sirhelpdeskpcmc@gmail.com हा ई-मेल उपलब्ध आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्र (२०८ ते २१५) वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट आणि कसबा पेठ या मतदारसंघांसाठी श्रीमती प्राची कचरे, महापालिका सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्कासाठी ०२०-२५५०६६४९ हा दूरध्वनी क्रमांक तसेच sirhelpdeskpmc@gmail.com हा ई-मेल उपलब्ध आहे.
मतदारांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भातील अडचणी, शंका किंवा आवश्यक माहितीसाठी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी केले आहे.


