Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा युवा पुरस्कारांसाठी अर्ज मागविले; १५ जुलैपर्यंत मुदत* 

जिल्हा युवा पुरस्कारांसाठी अर्ज मागविले; १५ जुलैपर्यंत मुदत* 

 

 

पुणे, दि. ७ (जिमाका, वृत्तसेवा): राज्याच्या युवा धोरणांतर्गत सन २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या चार वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यासाठी युवक, युवती आणि नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. युवक कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पात्र व्यक्ती व संस्थांनी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

जिल्हास्तरावर दरवर्षी एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. युवक व युवती पुरस्कारामध्ये गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी १० हजार रुपये, तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

 

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक अथवा युवतीचे वय संबंधित पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी किमान १३ वर्षे आणि ३१ मार्च रोजी कमाल ३५ वर्षे असावे. अर्जदाराचे संबंधित जिल्ह्यात सलग पाच वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. संस्था नोंदणीकृत असून किमान पाच वर्षांपासून कार्यरत असावी.

 

पुरस्कारासाठी ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक कार्य, युवा विकास, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, आपत्ती व्यवस्थापन, दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य तसेच राष्ट्र उभारणीसाठी दिलेले योगदान आदी बाबींचा विचार करण्यात येणार आहे.

 

अर्जासोबत केलेल्या कार्याचे सबळ पुरावे, आवश्यक कागदपत्रे तसेच मुलाखतीसाठी पीपीटी सादरीकरणाची सीडी जोडणे बंधनकारक आहे.

 

इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज १५ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सर्वे क्र. १९१, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूलसमोर, येरवडा, पुणे – ४११००६ येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

 

अधिक माहितीसाठी दादासाहेब देवकाते (९९२३९०२७७७), शिवाजी कोळी (७०२०३३०४८८), श्रीमती ज्योती सुयवंशी (७७९८३०२४८१) आणि श्रीमती अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७) यांच्याशी संपर्क साधावा.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments