Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedगडचिरोलीत गांधी विचारांच्या नव्या अध्यायाची सुरुवात ८२ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची शांततेच्या वाटेवर...

गडचिरोलीत गांधी विचारांच्या नव्या अध्यायाची सुरुवात ८२ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची शांततेच्या वाटेवर वाटचाल : गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम

पुणे : ज्यांच्या हातात एकेकाळी बंदूक होती, त्यांच्या हातात आज महात्मा गांधींच्या विचारांची पुस्तके आणि उत्तरपत्रिका दिसत होती. हिंसेच्या मार्गाचा त्याग करून शांतता, अहिंसा आणि समाजाशी नव्याने नाते जोडण्याचा संदेश देणाऱ्या ‘गांधी विचार प्रचार परीक्षा’ या अभिनव उपक्रमात ८२ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित परिवर्तनाच्या नव्या प्रवासाची आशादायी सुरुवात केली.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून आदर्श मित्र मंडळ (पुणे), श्री लक्ष्मीनृसिंह पतसंस्था (बल्लारपूर) आणि सर्वोदय मंडळ (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी विविध विधायक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेली ‘गांधी विचार प्रचार परीक्षा’ यशस्वीरित्या पार पडली. या अभिनव उपक्रमाची संकल्पना आदर्श मित्र मंडळ (पुणे)चे उदय जगताप, गडचिरोली पोलीस दलाच्या आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल आणि श्री लक्ष्मीनृसिंह पतसंस्था (बल्लारपूर)चे श्रीनिवास सुंचूवार यांची होती. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील ऊईके आणि सर्वोदय मंडळ (मुंबई)चे लक्ष्मण गोळे उपस्थित होते.

परीक्षेपूर्वी सहभागी सदस्यांसाठी आठ दिवसांचा गांधी विचार अभ्यास उपक्रम राबविण्यात आला. महात्मा गांधी यांचे जीवन, सत्य, अहिंसा, संविधान, लोकशाही आणि सामाजिक सलोखा या विषयांचा अभ्यास करून त्यानंतर चार दिवस संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये अहिंसा, भारतीय संविधान, समाजातील जबाबदाऱ्या आणि मुख्य प्रवाहातील जीवन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या सत्रांमधून सहभागींच्या शंकांचे निरसन करत त्यांच्यात समाजाच्या मुख्य प्रवाहात सकारात्मकपणे सहभागी होण्याचा नवा दृष्टिकोन निर्माण करण्यात आला.

परीक्षेतील गुणवंतांना अनुक्रमे प्रथम ११,००० रुपये, द्वितीय ७,५०० रुपये आणि तृतीय ५,००० रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच २५ आत्मसमर्पित सदस्यांना प्रत्येकी २,००० रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. सर्व सहभागी सदस्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. आत्मसमर्पित महिला बचत गटांनाही मान्यवरांच्या हस्ते धनादेशांचे वितरण करण्यात आले.

नरेंद्र पिवाल म्हणाले, नवीन आयुष्य स्वीकारण्याचा निर्धार केला तर गडचिरोली पोलीस दल प्रत्येक टप्प्यावर तुमच्या पाठीशी उभे राहील. मुख्य प्रवाहात येताना कोणताही संकोच न बाळगता मनापासून समाजाशी जोडले जावे, असेही त्यांनी सांगितले.

उदय जगताप म्हणाले, सत्य, अहिंसा, शांतता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश होता. गडचिरोली पोलीस दल गेल्या काही वर्षांपासून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. गांधी विचार प्रचार परीक्षा हा त्याच प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून मंडळाच्या वतीने त्यांना नेहमीच सहकार्य केले जाते, असेही त्यांनी सांगितले.

आदर्श मित्र मंडळ, पुणे आणि असंख्य सामाजिक संस्था, मित्रपरिवार व नागरिकांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. अग्निपंख, प्रोजेक्ट भरारी, दुर्गम भागासाठी टू-व्हीलर अॅम्ब्युलन्स, अनेक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, स्वातंत्र्यानंतर प्रथमच ७२ दुर्गम गावांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न, ३२ पोलीस ठाण्यांमध्ये ग्रंथालयांची स्थापना, तसेच शांतता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासारखे उपक्रम या सर्व उपक्रमांनी आत्मसमर्पित बांधवांच्या मनात समाज आणि शासनाविषयी विश्वास निर्माण केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments