पुणे, दि. १६ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून व्यापक स्तरावर काम सुरू असून या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मोलाची साथ दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील ९० लाख ८० हजार १७३ मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत असून, त्यासाठी जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच विविध राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त करण्यात आले आहेत.
ही प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि अचूक पद्धतीने पूर्ण व्हावी यासाठी पुणे कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स (आझम कॅम्पस) आणि सेंट मीरा कॉलेज, पुणे येथील प्रत्येकी १५० विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. मोबाईल अॅप आणि संगणकीय प्रणालीचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांकडून बीएलओंना गणना अर्जांचे वितरण, माहिती संकलन आणि डिजिटल नोंदणीसारख्या तांत्रिक कामात प्रभावी सहाय्य मिळत आहे. विद्यार्थी बीएलओंसोबत घरोघरी जाऊन मतदार पडताळणी प्रक्रियेत सक्रिय योगदान देत आहेत.
या उपक्रमामुळे मतदार पुनरीक्षण प्रक्रिया अधिक कार्यक्षम होण्यास मदत होत असून, प्रशासन आणि युवक यांच्यातील समन्वयाचे हे एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे.
जिल्हा निवडणूक प्रशासनाने पुणे कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स (आझम कॅम्पस) आणि सेंट मीरा कॉलेज यांच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व महाविद्यालये व शिक्षण संस्थांनीही या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तसेच इच्छुक विद्यार्थ्यांनी बीएलओंना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून तरुणांच्या सहभागातून पुणे जिल्ह्याची मतदार यादी अधिक अचूक व परिपूर्ण तयार करता येईल.
तसेच, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत आपल्या परिसरात येणाऱ्या बीएलओंना मतदारांनी आवश्यक कागदपत्रे व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे. मतदारांच्या सक्रिय सहभागातूनच अचूक, विश्वासार्ह आणि अद्ययावत मतदार यादी तयार होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.


