Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रदर्शन सहायक विलास कसबे यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार*

प्रदर्शन सहायक विलास कसबे यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार*

 

 

पुणे दि.३१: विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहायक विलास कसबे हे ३१ वर्षे ६ महिन्याच्या दीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. कसबे यांच्यामधील जनसंपर्काची, तत्परतेने काम करण्याची कला व नवनव्या गोष्टी शिकण्याचा गुण अन्य कर्मचाऱ्यांनी अंगिकारावा, असे आवाहन डॉ. मोघे यांनी केले.

 

विभागीय माहिती कार्यालयात श्री. कसबे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहायक संचालक सचिन गाढवे, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी तसेच सौ. लता कसबे, मुलगा जयेश, आदित्य, स्नुषा मृणालिनी उपस्थित होते.

 

डॉ. मोघे म्हणाले, कसबे यांनी त्यांच्या सेवा काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत जिव्हाळ्याचे, कौटुंबिक स्वरूपाचे नाते जपले. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील गाढा अनुभव होता. त्यांना सांगितलेले काम विश्वासाने पूर्ण होणार अशी खात्री होती. कार्यालयात नेहमी हसते- खेळते वातावरण ठेवले. त्यांनी नेहमीच अधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देण्याचा प्रशासकीय व्यवस्थेतील गुण टिकवून ठेवला. सेवानिवृत्तीनंतर पर्यटनाला प्राधान्य द्यावे. आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे सांगून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

श्री. पाटील म्हणाले, श्री कसबे यांचे काम माहिती व जनसंपर्क कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याने बोध घ्यावा असे होते. कसबे हे अत्यंत सुहृदय व्यक्तिमत्व आहे. मोठा जनसंपर्क असणाऱ्या व्यक्तींचे घराकडे थोडे दुर्लक्ष होते, त्यामुळे कसबे यांनी आता कुटुंबाला वेळ द्यावा. कसबे यांनी आपल्या कामाला पूर्णपणे न्याय दिला असे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी श्री. गाढवे, जयश्री रांगणेकर, ज्ञानेश्वर कोकणे, नितीन पवार, सुहास सत्वधर, सचिन बहुलेकर, सुनील झुंजार, वर्षा कोडलिंगे यांनी मनोगत व्यक्त केले.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments