Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी डॉ. शिवाजीराव कदम

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी डॉ. शिवाजीराव कदम

 

 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. पुण्यातील गांधी भवन येथे झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. गेले सुमारे २० वर्षे संस्थेचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर आता ही निवड करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि. चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांचा विश्वस्त मंडळात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी दिली. या व्यतिरिक्त तुषार गांधी, लक्ष्मीकांत देशमुख, सिसिलिया कार्व्हालो, अॅड. अभय छाजेड, मच्छिंद्र गोर्डे, एम. एस. जाधव, रमेश आढाव यांचा विश्वस्त मंडळात समावेश आहे. तसेच सुनील पाटील हे निमंत्रित विश्वस्त आहेत.

 

१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे विचार व कार्य कायम राखून वाढवण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात गांधी स्मारक निधी अंतर्गत गांधीभवन त्या त्या राज्याच्या नावाने उभारण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रात १९५० नंतर या कार्याची सुरुवात होऊन १९६१ मध्ये पुण्यात कोथरूड येथे गांधी भवन साकारले गेले. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्याचे उद्घाटन केले. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मामासाहेब देवगिरीकर, बाळासाहेब भारदे आणि डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गेल्या ७५-७६ वर्षांत अध्यक्षपदाची धुरा सांभाळी.

 

डॉ. शिवाजीराव कदम हे भारतीय विद्यापीठाचे कुलपती असून दीर्घकाळ महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त आहेत. त्याचे ज्येष्ठ बंधू कै. डॉ. पतंगराव कदम यांच्याप्रमाणेच डॉ. शिवाजीराव कदम यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात मोठा पुढाकार घेतला. गांधीभवन येथील गांधी दर्शन शिबीरे आणि पहिल्या पुण्यातील गांधी विचार साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा विशेष पुढाकार होता. विवेक सावंत हे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि. चे व्यवस्थापकीय संचालक होते. आता मुख्य मार्गदर्शक म्हणून ते काम बघत आहेत. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना देखील संगणक प्रशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांच्या पुढाकाराने सुरु झालेला एम. एस. सी. आय. टी. हा संगणक प्रशिक्षण कोर्स खूप लोकप्रिय व परिणामकारक झाला.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments