Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedएकपात्री महोत्सवा'तून अभिनय कलेच्या विविध पैलूंचा वेध* *सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे...

एकपात्री महोत्सवा’तून अभिनय कलेच्या विविध पैलूंचा वेध* *सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ७ व ८ ऑगस्ट रोजी पुणे येथे परिसंवाद व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन*

पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘एकपात्री महोत्सवा’चे आयोजन शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट आणि शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी भरतमुनी रंगघन, चिंतामणी मंदिराजवळ, सेक्टर क्र. २४, निगडी प्राधिकरण, पुणे येथे करण्यात आले आहे. ‘पात्र एक… पण मुखवटे अनेक!’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात एकपात्री अभिनय कलेचे विविध पैलू उलगडणारे परिसंवाद आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास सर्व रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.

एकपात्री अभिनय ही रंगभूमीवरील अत्यंत आव्हानात्मक आणि प्रभावी कलाविष्काराची परंपरा आहे. एकाच कलाकाराच्या अभिनय, वाचिक अभिव्यक्ती, देहबोली, भावविश्व आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा आणि विविध भावछटा साकारण्याची क्षमता या कलाप्रकारात अनुभवता येते. या कलेचा अभ्यास, संवर्धन आणि नवोदित कलाकारांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ५.०० ते रात्री ८.०० या वेळेत आयोजित परिसंवाद व मार्गदर्शन सत्रात मकरंद टिल्लू, प्रकाश पारखी, राहुल भालेराव, प्रचिती सुरु आणि शारदा मुंढे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत प्रकाश पारखी, दीपक रेगे, अंजली कराडकर आणि चैताली माजगावकर यांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले आहे.

या परिसंवादातून एकपात्री अभिनयाची संकल्पना, सादरीकरणाची तंत्रे, व्यक्तिरेखा उभारणी, रंगमंचावरील अभिव्यक्ती, आवाजाचा प्रभावी वापर आणि एकपात्री सादरीकरणातील विविध पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे. नवोदित कलाकार, नाट्य विद्यार्थी, रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींसाठी हा महोत्सव अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचे जतन व संवर्धन करणे, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच दर्जेदार नाट्यकलेविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सदर महोत्सव सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यभर विविध नाट्य, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने करण्यात येत आहे.

पुणे व परिसरातील नाट्यप्रेमी, कलाकार, विद्यार्थी, रंगकर्मी आणि सांस्कृतिकप्रेमींनी या अभ्यासपूर्ण महोत्सवाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments