पुणे,5 ऑगस्ट 2026 : स्तनपान हे केवळ पोषणापुरते मर्यादित नसून ते बाळाचे आरोग्य आणि निरोगी भविष्याचा भक्कम पाया आहे,मात्र स्तनपानाचे प्रमाण घटत चालल्याने तज्ञांच्या मते बहुआयामी उपाययोजनांची गरज आहे.यामध्ये प्रसूतीपूर्व समुपदेशन,कुटुंबाचे समुपदेशन,रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी स्तनपानाविषयी प्रशिक्षण,रूग्णालयातून घरी परतल्यानंतर आवश्यक व्यवस्था तसेच कामाच्या ठिकाणी सुविधा आणि धोरणात्मक सुधारणा यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण (एनएफएचएस -6) च्या ताज्या आकडेवारीनुसार बालकांमध्ये 6 महिन्यापर्यंतच्या स्तनपानाचे प्रमाण (एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग) 63.7 टक्क्यांवरून 55.6 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर येथील लॅक्टेशन सल्लागार डॉ.संगीता खराटे म्हणाल्या की,स्तनापानामध्ये अनेक समस्या येऊ शकतात.त्यामध्ये अपुरे ग्रंथीयुक्त ऊतक यासारखी शारीरिक कारणे असू शकतात.पण स्तनपान लवकर थांबण्यामागे प्रामुख्याने भावनिक, संरचनात्मक आणि इतर टाळता येण्याजोगे अडथळे कारणीभूत असतात.त्यामुळे प्रसूतीनंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवसांमध्ये अधिक मार्गदर्शनाची गरज असते.
त्यापुढे म्हणाल्या की,जेव्हा मातांना वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही आणि त्यांना बाळाला योग्य प्रकारे न पकडणे (लॅचिंग समस्या), वेदना,दुधाचा अपुरा पुरवठा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो किंवा शारीरिक पुनर्प्राप्ती व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.तसेच प्रसूतीनंतरच्या नैराश्याचा (पोस्टपार्टम डिप्रेशन) चा धोका वाढू शकतो.त्यामुळेच गर्भधारणेपासून ते स्तनपानाच्या संपूर्ण कालावधीपर्यंत त्यांना सातत्यपूर्ण आणि संवेदनशील सेवा पुरवणे आवश्यक आहे.
त्या पुढे म्हणाल्या की,प्रमुख कृतीयोग्य गोष्टींमध्ये लवकर स्तनपान सुरू करणे, स्तनपानाविषयी प्रसूतीपूर्व मार्गदर्शन,कुटुंबाचे समुपदेशन,रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाद्वारे बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह (बीएफएचआय) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करणे,स्तनपानाबाबत मार्गदर्शन देण्यासाठी क्लिनिक्स,हेल्पलाईन व डिजिटल कम्युनिटी प्लॅटफॉर्म यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. नोकरी करणाऱ्या मातांमध्ये स्तनपान सुरू ठेवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 6 महिन्यांची पगारी प्रसूती रजा,पाळणाघर/डे केअरची सुविधा इत्यादी बाबींसह उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
डॉ.खराटे म्हणाल्या की,या सर्व गोष्टींमध्ये कुटुंबाचे पाठबळ महत्त्वाचे असते.बाळाच्या नित्याच्या देखभालीची कामे वाटून घेणे यामुळे मातांना विश्रांती आणि स्वत:ची काळजी घेण्यास आवश्यक वेळ मिळेल व स्तनपानाचे परिणाम सुधारण्यास हातभार लागेल.


