Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedएका भ्रूण संकलनातून चार उच्च आनुवंशिक मुऱ्हा रेडकांचा जन्म* *ET-IVF तंत्रज्ञानाची...

एका भ्रूण संकलनातून चार उच्च आनुवंशिक मुऱ्हा रेडकांचा जन्म* *ET-IVF तंत्रज्ञानाची महाराष्ट्रात मोठी झेप; पशुधन आनुवंशिक सुधारणेस नवी दिशा*

पुणे, दि. ६ : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर अंतर्गत कार्यरत शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे (पुणे) येथील ET-IVF (Embryo Transfer–In Vitro Fertilization) प्रयोगशाळेत अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या चार निरोगी रेडकांचा (तीन मादी व एक नर) यशस्वी जन्म झाला आहे. राज्यातील म्हैस संवर्धन व उच्च आनुवंशिक क्षमतेचे पशुधन निर्माण करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.

या उपक्रमासाठी वाकड (पुणे) येथील श्री. स्वप्नील कलाटे यांच्या उच्च दुग्ध उत्पादक मुऱ्हा म्हशीचा डोनर म्हणून वापर करण्यात आला. एका स्त्रीबीज संकलन सत्रात १७ ओसाइट्स (अंडपेशी) संकलित करण्यात आल्या. त्यापैकी पाच उच्च दर्जाचे भ्रूण विकसित करून ते शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, ताथवडे येथील दाई म्हशींमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. यापैकी चार म्हशींमध्ये यशस्वी गर्भधारणा झाली असून त्यातून तीन मादी व एक नर अशा चार निरोगी मुऱ्हा रेडकांचा जन्म झाला.

या संपूर्ण प्रक्रियेत स्त्रीबीज संकलन (OPU) ते भ्रूण प्रत्यारोपणापर्यंतची सर्व तांत्रिक कामे डॉ. विष्णू जवणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. दाई म्हशींची आरोग्य तपासणी व माज नियमनाची जबाबदारी डॉ. रतिकांत नवटके यांनी सांभाळली. या प्रकल्पाची अंमलबजावणी डॉ. उदय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, जन्मलेल्या रेडकांचे संगोपन व व्यवस्थापन डॉ. उपेंद्र गायकवाड आणि डॉ. अमोल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

उच्च आनुवंशिक क्षमतेच्या म्हशींची जलद निर्मिती, उत्कृष्ट दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या पशुधनाचा प्रसार आणि राज्यातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी ET-IVF तंत्रज्ञानाचा हा प्रयोग महाराष्ट्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

राज्यात ET-IVF तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक विस्तार करण्यासाठी सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रीय उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत राज्यातील सर्व शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रांमध्ये उच्च वंशावळीचे सर्व जातींचे वळू निर्माण करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांनी दिली.

राज्यात वाढत्या दर्जेदार म्हशीच्या दुधाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उच्च आनुवंशिक क्षमतेच्या म्हशींची निर्मिती आवश्यक असून, ET-IVF सारखे आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान भविष्यातील दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे उच्च उत्पादकता, जलद आनुवंशिक सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी सांगितले.

या तंत्रज्ञानाविषयी अधिक माहितीसाठी तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्यासाठी १९६२ या टोल-फ्री कॉल सेंटरवर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments