NHC Foods Limited (BSE: 517554): एनएचसी फुडस् या सरकारमान्य ‘थ्री-स्टार एक्सपोर्ट हाऊस’ आणि अन्न प्रक्रिया कंपनीने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा लेखापरीक्षण न झालेला एकत्रित परिचालन महसूल वार्षिक आधारावर २३४.५४ टक्क्यांनी वाढून ३६९.६९ कोटी रुपये झाला आहे. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत हा महसूल ११०.५१ कोटी रुपये होता.
दरम्यान, २०२७ मध्ये पहिल्या तिमाहीत इबिआयटीडीए २१.२९ कोटी रुपये राहिला, जो २०२६ मधील पहिल्या तिमाहीत ३.४८ कोटी रुपयांच्या तुलनेत ५१२.४३ टक्क्यांची वाढ दर्शवतो. लेखापरीक्षण न झालेला एकत्रित नफा १६.९९ कोटी रुपये नोंदवला गेला, जो २०२६ च्या पहिल्या तिमाही मधील १.६७ कोटी रुपयांच्या तुलनेत ९१९.८१ टक्क्यांची वाढ दर्शवतो. ‘बेसिक ईपीएस’ (ईपीएस) प्रति शेअर ०.२६ रुपये राहिला, जो २०२६ मध्ये पहिल्या तिमाहीत प्रति शेअर ०.०३ रुपये होता.
आर्थिक वर्ष २०२७ मधील पहिल्या तिमाहीच्या कामगिरीबद्दल बोलताना एनएचसी फुडस् लि. चे व्यवस्थापकीय संचालक सत्यम शिरीषचंद्र जोशी म्हणाले, “आम्हाला २०२७ मधील पहिल्या तिमाहीच्या दमदार कामगिरीचा आनंद आहे, ज्यामध्ये महसूल आणि परिचालन नफा यामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. ही तिमाही आमच्या व्यवसायाच्या कामकाजातील सातत्यपूर्ण गती दर्शवते, ज्याला वाढलेली व्याप्ती आणि उत्तम अंमलबजावणीची जोड मिळाली आहे. आम्ही आमची उत्पादने अधिक सक्षम करण्यावर, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्यावर आणि कामकाजाची कार्यक्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. मजबूत पाया आणि व्यवसायाच्या वाढत्या संधींच्या जोरावर, आम्ही शाश्वत विकास साधण्यासाठी आणि आमच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
आर्थिक वर्ष २०२६ साठी, कंपनीने १२.३२ कोटी रुपयांचा लेखापरीक्षण न झालेला एकत्रित नफा नोंदवला. २०२६ या वर्षातील परिचालन महसूल ६०१.३१ कोटी रुपये होता, जो २०२५ या वर्षात ३४७.८८ कोटी रुपयांच्या तुलनेत ७२.८५ टक्क्यांची वार्षिक वाढ दर्शवतो.
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ईबीआयटीडीए १६.४२ कोटी रुपये होता. त्या तुलनेत २०२६ मध्ये ही रक्कम २१.९५ कोटी रुपये इतकी झाली. ज्यामुळे वार्षिक आधारावर ३३.६८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. तसेच ‘बेसिक ईपीएस’ प्रति शेअर ०.२० रुपये इतका राहिला.
भांडवली पाया बळकट करणे
कंपनीने अलीकडेच मे.’ग्लोबल फोकस फंड’ला १०,४१,७७,०४० पूर्णपणे पेड-अप इक्विटी शेअर्सचे वाटप करून आपला भांडवली पाया बळकट केला आहे. हे वाटप एकूण ११ लाख अमेरिकन डॉलर्स (यूएसडी) मूल्याच्या ११ एफसीसीबी (FCCBs) च्या अंशतः रूपांतरणामुळे करण्यात आले. या रूपांतरणानंतर, कंपनीचे पेड-अप इक्विटी शेअर भांडवल वाढून ७६.१९ कोटी रुपये झाले आहे.
पुढील एका धोरणात्मक घडामोडीत, संचालक मंडळाने ‘ॲग्रीकनेक्ट सोल्युशन्स प्रा. लि.’ मधील प्रस्तावित गुंतवणूक आणि अधिग्रहणासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ला मंजुरी दिली व त्यावर स्वाक्षरी केली. ही कंपनी कृषी-मालाचा पुरवठा आणि व्यापार करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. हा प्रस्तावित व्यवहार कंपनीला कृषी-माल क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्याची आणि आपल्या व्यावसायिक कामकाजात अधिक विविधता आणण्याची संधी देतो.
एनएचसी फूड्स लि.बद्दल
एनएचसी फूड्स लि. ही सरकारमान्य ‘थ्री-स्टार एक्सपोर्ट हाऊस’ असून ती संपूर्ण आणि दळलेले मसाले, डाळी, कडधान्ये, धान्य, तेलबिया, इतर कृषी-माल आणि विविध खाद्यपदार्थांवर प्रक्रिया करणे, त्यांची खरेदी करणे आणि निर्यात करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सेवा पुरवते आणि आपल्या खरेदी, प्रक्रिया व वितरण क्षमता बळकट करण्यासोबतच दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते. एनएचसी फूड्स कृषी-माल मूल्य साखळीतील धोरणात्मक उपक्रमांद्वारे आपला व्यवसाय विस्तारत देखील आहे.


