पुणे, दि. १७ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला असून, आतापर्यंत ९९.९८ टक्के अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ६७.९४ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले तर ३१.९२ टक्के अप्राप्य (Uncollectable) आहेत. अशी माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार श्रीमती शीतल मुळे-भामरे आणि निवडणूक नायब तहसीलदार श्री. संतोष सानप यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये अर्ज वितरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ९९.९८ टक्के मतदारांना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. प्राप्त अर्जांपैकी ६७.९४ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत आहे. अर्जांचे वितरण आणि डिजिटायझेशन या दोन्ही टप्प्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात अडचणी व सूचना मांडल्या. यावेळी अडचणींचे निरसन करण्यात आले.


