पुणे, दि. १९ : महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘ई पिंक -रिक्षा योजने’ अंतर्गत शासन अनुदानात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ई-रिक्षा खरेदीसाठी मिळणारे २० टक्के शासन अनुदान आता ४० टक्के करण्यात आले आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार योजनेतील अनुदानाचा हिस्सा २० टक्क्यांवरून ४० टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना ई-रिक्षाच्या किमतीच्या ४० टक्के शासन अनुदानाचा लाभ मिळणार आहे. योजनेतील आर्थिक रचना लाभार्थीचा स्वहिस्सा १० टक्के, शासन अनुदान ४० टक्के आणि कर्ज ५० टक्के अशी राहणार आहे.
यापूर्वी या योजनेअंतर्गत २० टक्के शासन अनुदान घेऊन ई पिंक -रिक्षा प्राप्त केलेल्या लाभार्थी महिलांनाही वाढीव अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. अशा लाभार्थींना अतिरिक्त २० टक्के शासन अनुदानाचा दावा करता येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी सुलभ व पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे लाभार्थी नोंदणी, अर्ज स्वीकारणे, अर्ज छाननी, कागदपत्र पडताळणी, मंजुरी तसेच इतर संबंधित कार्यवाही करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील योजनेस पात्र महिलांनी योजनेची माहिती जाणून घेऊन अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आवश्यक माहिती अचूक व परिपूर्ण स्वरूपात भरून आवश्यक कागदपत्रे विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
यापूर्वी २० टक्के शासन अनुदानावर ई-रिक्षा प्राप्त केलेल्या लाभार्थींनी पोर्टलवर ‘Additional Anudan Dava’ (अतिरिक्त अनुदान दावा) या सुविधेद्वारे ऑनलाइन दावा सादर करावा. संबंधित लाभार्थींनी पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करून अतिरिक्त २० टक्के अनुदानासाठी दावा करावा.
योजनेबाबतची अधिकृत व अद्ययावत माहिती तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी wcdpinkerrickshaw.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिनी ढवळे यांनी केले आहे.
००००


