पुणे, 19 ऑगस्ट 2026 – मध्य प्रदेशातील पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या भागांमध्ये भूजल पुनर्भरण करण्यासोबतच जैवविविधतेचे पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट ब्रिजस्टोन इंडियाने ठेवले आहे. सोसायटी फॉर अॅग्रिकल्चर अँड एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबिलिटीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट प्रवाह’ अंतर्गत मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील सुमारे 140 एकर पाणलोट क्षेत्रातील तीन पारंपरिक जलस्रोतांचा पुनरुज्जीवनासाठी समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भूजलाच्या अतिउपशामुळे या भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे.
धार जिल्ह्याला गेल्या काही वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई तसेच भूजलस्रोतांच्या ऱ्हासाचा सामना करावा लागला आहे. भूजल उपशाची पातळी वार्षिक भूजल पुनर्भरणाच्या 100 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून काही ठिकाणी ती त्याहूनही अधिक झाली आहे. यावरून भूजलाचा वापर अस्थिर पद्धतीने होत असल्याचे स्पष्ट होते. विशेषतः पावसाळ्यापूर्वीच्या महिन्यांमध्ये भूजलपातळी जमिनीखाली 10 ते 20 मीटरपर्यंत घसरली आहे. याचा पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर तसेच सिंचनावर मोठा परिणाम झाला आहे.
‘प्रोजेक्ट प्रवाह’च्या माध्यमातून जलसुरक्षा सुनिश्चित केली जात आहे, स्थानिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे आणि समुदायांना समृद्ध होण्यासाठी सक्षम केले जात आहे. यासाठी निसर्गाधारित पुनर्स्थापना, प्रत्यक्ष क्षेत्रात समुदायाचा सहभाग तसेच परिसरातील वंचित महिलांसाठी उपजीविकेच्या नव्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. पर्यावरणविषयक शिक्षण, जैवविविधतेबाबत जागरूकता आणि निसर्गसंवर्धनाला चालना देण्यासाठी विकसित करण्यात आलेली 9.5 एकरांची जैवविविधता उद्याने आणि सामुदायिक बागांसह संस्थेच्या विद्यमान जैवविविधता उपक्रमांमध्येही या प्रकल्पामुळे भर पडत आहे.
या उपक्रमाचा उद्देश तब्बल 1.5 लाख मेट्रिक टन भूजलाचे पुनर्भरण करणे हा आहे. यामुळे आसपासच्या घरांसाठी, पशुधनासाठी आणि शेतीसाठी अधिक स्थिर पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच, अधिक जैवविविधतेला पोषक अधिवास निर्माण होईल आणि ग्रामीण समुदायांना हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना अधिक सक्षमपणे सामोरे जाण्यास मदत मिळेल.
“पर्यावरणाची आणि ज्या समुदायांची आम्ही सेवा करतो त्यांची काळजी घेणे हे ब्रिजस्टोनच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य भाग आहे. धारमधील समुदायांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय करणे हे ‘प्रोजेक्ट प्रवाह’चे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही या जलस्रोतांचे पुन्हा सजीव परिसंस्थांमध्ये रूपांतर करत आहोत, ज्याचा या समुदायांना मोठा फायदा होईल,” असे सुधीर कुलकर्णी, कार्यकारी संचालक – मानव संसाधन, प्रशासन आणि CSR, यांनी सांगितले.
‘प्रोजेक्ट प्रवाह’च्या माध्यमातून ब्रिजस्टोन इंडिया जलाशयांचे सजीव परिसंस्थांमध्ये पुनरुज्जीवन करून समाजाच्या कल्याणासाठी उच्च दर्जाच्या उपक्रमांद्वारे सेवा देण्याची आपली बांधिलकी अधिक दृढ करत आहे. या उपक्रमामुळे पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यास, जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनाला चालना देण्यास आणि शाश्वत भविष्यासाठी समुदायांची हवामान बदलासह विविध आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता बळकट करण्यास मदत होईल.


