Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedचांगल्या किंवा वाईट स्थितीत वाणीमध्ये समत्व भाव ठेवणे गरजेचे* *आचार्य श्री...

चांगल्या किंवा वाईट स्थितीत वाणीमध्ये समत्व भाव ठेवणे गरजेचे* *आचार्य श्री महाश्रमणजी ; आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजित प्रवचनाचा तिसरा दिवस*

पुणे : जीवनात विचारांची देवाणघेवाण करण्याचे वाणी हे साधन आहे. वाणी रुपी रथावर आरूढ होऊन विचार व भाव बाहेर जातात. त्यामुळे आपण कोणावरही खोटा आरोप करता कामा नये, याला पाप समजले जाते. माणसाला राग आलेला असताना वाणी वर नियंत्रण ठेवले, तर रागावर नियंत्रण ठेवता येते. मौन ठेवले, तर हे सहज शक्य आहे. चांगल्या किंवा वाईट अशी कोणतीही परिस्थिती आली, तरी देखील शांती व धैर्य ठेवले पाहिजे. दोन्ही स्थितीमध्ये समत्व भाव ठेवणे आवश्यक आहे, असे जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांनी सांगितले.

आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात आचार्य श्री महाश्रमणजी यांची प्रवचनमाला सुरु आहे. त्याच्या तिसऱ्या दिवशी ते बोलत होते.

श्री महाश्रमणजी म्हणाले, भाषा प्राणीमात्रांकडे देखील असते, परंतु माणसाकडे जी भाषा आहे. ती भाषा व्यापक व विकसित आहे. जगात अनेक भाषांचा वापर केला जातो. आज अनेक भाषा शिकाव्या लागतात. भाषा मूळ गोष्ट नाही. भाषा हे साधन आहे, साध्य हा विषय आहे, तो आपण समजून घ्यायला हवा. जगात एकच भाषा असती, शास्त्र असते, तर जेवढा वेळ सगळ्या भाषा शिकण्यास लागतो, तो प्रत्येकाचा वाचला असता. त्या वेळेचा उपयोग इतर चांगल्या गोष्टींकरिता आपण वापरू शकलो असतो. जी भाषा आपल्या दैनंदिन आयुष्यात सहजोपयोगी ठरेल, ती भाषा उपयुक्त असते.

ते पुढे म्हणाले, शारीरिक व्यंगामुळे अनेकांना बोलता किंवा ऐकायला येत नाही, तर स्वभावामुळे काहीजण बोलू शकत नाही. भाषेची शक्ती होणे देखील महत्वाचे आहे. ज्यांच्याकडे भाषेची शक्ती आहे, ते भाषेचा प्रयोग कधी व कोणत्या स्वरूपात करतील, हे महत्वाचे आहे. आवश्यकते शिवाय बोलणे हे उपयुक्त नाही. बोलणे किंवा न बोलण्यात विवेक ठेवणे आवश्यक आहे. कुठे बोलणे आणि कुठे न बोलणे तसेच काय, कसे बोलावे हे आपल्याला समजणे गरजेचे आहे.

खूप वेळ गरज नसताना जास्त वेळ बोलणे आणि सार व अर्थहीन गोष्टी बोलणे, हे वाणीमध्ये असलेले दोन प्रकारचे विष आहेत. कमी वेळेत कामाविषयी बोलणे हे वाणीचे अमृत असून याचा उपयोग केल्यास चांगला वक्ता तयार होऊ शकतो. जे बोलायचे ते खरे बोलायला हवे. खोटे न बोलणे हा नियम अंगिकारायला हवा. चांगले व गोड बोलण्याने सुखप्राप्ती करता येईल.

श्री महाश्रमणजी यांचे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात दिनांक २ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजता प्रवचन होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अणुव्रत समिती आयोजनात सहभागी झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments