पुणे, दि. २२ ऑगस्ट २०२६:
संवैधानिक लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी माओवाद्यांनी आजवर शेतकरी, कामगार आणि आदिवासींचा हत्यार म्हणून वापर केला. मात्र, हे घटक दूर झाल्यावर आता माओवाद्यांनी आपले लक्ष विद्यार्थी चळवळींकडे वळवले असून समाजाने याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे, असा गंभीर इशारा नक्षलवादाचे अभ्यासक आणि बस्तरचे भूमिपुत्र राजीव रंजन प्रसाद यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या ‘देवर्षी नारद माध्यम पुरस्कार’ सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून प्रसाद बोलत होते.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये व्हीएसके पुणे फाउंडेशनचे विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) यांच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’, तर ‘सकाळ’चे विशेष बातमीदार मयुरेश प्रभुणे आणि ‘प्रभात’च्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच सोशल मीडिया विभागात मोनेश शेलार यांना सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उमेश शेळके आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचाही विशेष सत्कार झाला. मंचावर व्हीएसकेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, डीईएसचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे आणि कार्यवाह आनंद काटीकर उपस्थित होते.
नक्षलवादाचा भीषण अनुभव मांडताना राजीव रंजन प्रसाद म्हणाले की, माओवादी विचारसरणी लोकशाही मार्गाने कधीही सत्तेवर येऊ शकत नाही. म्हणूनच बंदुकीच्या नळीतून सत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी आदिवासींवर अमानुष अत्याचार केले, त्यांना विकासापासून दूर ठेवले आणि त्यांची मूळ संस्कृती नष्ट केली. जंगलातील नक्षलवाद ५० वर्षांनंतर आज घटला असला, तरी नागरी भागातील ‘दिमागी नक्षलवाद’ हे मोठे आव्हान ठरत आहे. शेतकरी व आदिवासींना माओवाद्यांचे खरे रूप समजल्याने त्यांनी या चळवळीला नकार दिला आहे. त्यामुळे आता आपली चळवळ जिवंत ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःची विचारसरणी आणि भूमिका इतिहासातील वास्तवाच्या आधारे पुन्हा तपासून पाहावी, असे आवाहन त्यांनी केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्रीधर लोणी म्हणाले,”आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कमालीचे ध्रुवीकरण झाले आहे. पत्रकार आपल्या विचारांचा असेल तरच तो निष्पक्ष, असा सोयीस्कर समज पसरला आहे. परंतु, पत्रकाराने कोणत्याही छावणीत न राहता सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. देशात आर्थिक प्रगती झाली असली तरी शिक्षण, आरोग्य आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत सार्वजनिक सेवांचे खाजगीकरण होत आहे. परिणामी उत्पन्न वाढूनही सामान्य माणसाचे जगणे सुकर झालेले नाही.”
आपल्या भावना व्यक्त करताना अंजली खमितकर म्हणाल्या की, माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात मी अनेक स्थित्यंतरे पाहिली. धडाडीने काम केले म्हणूनच सुरक्षित कोषातून बाहेर पडता आले. डिजिटल युगातही मुद्रित माध्यमांवरील माझा विश्वास ठाम आहे, कारण आव्हाने पेलण्याची क्षमता असेल तर माध्यम कोणतेही असो, काम करता येते. मयुरेश प्रभुणे यांनी खंत व्यक्त करताना सांगितले,”समाजाप्रमाणेच प्रसारमाध्यमांमध्येही विज्ञानाला मुख्य धारेत स्थान मिळत नाही. ज्या दिवशी विज्ञान पत्रकारिता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मुख्य प्रवाहात येईल, त्याच दिवशी भारतीय समाज खऱ्या अर्थाने समृद्ध होईल.” सोशल मीडियावरील आव्हानांवर बोलताना मोनेश शेलार म्हणाले की, सध्या इतिहासावर आणि वर्तमानावर वेगवेगळ्या विचारधारांचा प्रचंड भडीमार होत आहे. या गदारोळातून सत्य बाहेर काढून ते समाजासमोर निष्पक्षपणे मांडणे हे आजच्या डिजिटल माध्यमांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.
प्रास्ताविकात अभय कुलकर्णी यांनी पत्रकारिता आणि माध्यमांच्या केंद्रस्थानी ‘राष्ट्रीयत्व’ असावे, या ध्येयाने विश्व संवाद केंद्र कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. तर ॲड. अशोक पलांडे यांनी माहितीच्या प्रचंड वेगात वाचकांपर्यंत अचूक आणि सत्य माहिती पोहोचवणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशिकर यांनी केले, तर आनंद काटीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
——–
————


