Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्ञानाधिष्ठित पिढी घडविण्यासाठी ‘आय.एस.बी.अँड एम.’च्या कायम पाठीशी राहू -माजी विद्यार्थी -‘आय.एस.बी.अँड...

ज्ञानाधिष्ठित पिढी घडविण्यासाठी ‘आय.एस.बी.अँड एम.’च्या कायम पाठीशी राहू -माजी विद्यार्थी -‘आय.एस.बी.अँड एम.’ तर्फे २००१-२००३ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्या उत्साहात

पुणे,दि. २२:नांदे येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया (‘आय.एस.बी.अँड एम.’) संस्थेच्या २००१-२००३ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतानाच संस्थेने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात, नेतृत्वगुणांमध्ये आणि व्यावसायिक जडणघडणीत दिलेल्या योगदानाचे आवर्जून स्मरण केले. भविष्यातही ज्ञानाधिष्ठित पिढी घडविण्यासाठी संस्था आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कायम पाठीशी राहण्याचा निर्धार यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
यावेळी ‘आय.एस.बी.अँड एम.’ संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार, माजी विद्यार्थी सिम्फनी लिमिटेड दुबई कंट्री मॅनेजर अमित दिवाण, पीपल्सक्वेअर ह्युमन रिसोर्स कन्सल्टिंग, सह-संस्थापक केतन रायकर, नुवोरा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बक्षी, केफिन टेक टेक्नॉलॉजीज लिमिटेड, सहाय्यक उपाध्यक्ष शालू शर्मा, युनिटी स्मॉल फायनान्स बँक, ग्रुप हेड अनिरुद्ध जैन, ओपीडीश्योर सीओओ नीरज कपूर, इन्फोसिस, सीनियर लीड अर्पणा इंगळे यांच्यासह संस्थेचे विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी सांगितले की, २५ वर्षांपूर्वी ‘आय.एस.बी.अँड एम.’ची सुरुवात होताना संस्था आणि विद्यार्थ्यांसमोर स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान होते. नव्या संस्थेची ओळख निर्माण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनीही स्वीकारली. “आयएसबीएम आमच्यासाठी केवळ महाविद्यालय नव्हते, तर पहिले ‘स्टार्टअप’ होते. मर्यादित साधनांत काम करणे, समस्या सोडविणे, पुढाकार घेणे आणि परिणाम साध्य करणे येथे शिकलो,” असे त्यांनी नमूद केले. संस्थेने दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण दिल्याचे सांगताना, प्रत्यक्ष कामातून संवादकौशल्य, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि जबाबदारीची जाणीव विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले. अपयशातून पुन्हा उभे राहण्याची चिकाटी आणि उद्योजकीय मानसिकता ही संस्थेची मोठी देणगी असल्याचेही माजी विद्यार्थी यांनी नमूद केले.
चौकट:
‘नोकरी शोधणारे’ नव्हे तर ‘नोकरी निर्माण करणारे’ बनण्याचा सल्ला
सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थ्यांनी निडरता, चिकाटी, मेहनत आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. भविष्यात रोजगाराच्या संधींचे स्वरूप बदलणार असले तरी संधींची कमतरता भासणार नाही. त्यामुळे केवळ नोकरी मिळविण्याचा विचार न करता स्वतःची कौशल्ये विकसित करून व्यवसाय आणि रोजगार निर्माण करण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांनी विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

चौकट:
माजी विद्यार्थ्यांचा संस्थेला सक्रिय सहभागाचा निर्धार
संस्थेच्या पुढील वाटचालीत योगदान देण्याबाबतही माजी विद्यार्थ्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. अनेक माजी विद्यार्थी आपल्या कंपन्यांमध्ये आयएसबीएमच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या संधी देत आहेत. काही जण अतिथी व्याख्याने, कार्यशाळा, समूहचर्चा, प्रवेश प्रक्रिया आणि उद्योगाभिमुख उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. काही माजी विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि इतर उपक्रमांनाही आर्थिक मदत केल्याचे सांगण्यात आले.

——-

कोट:
‘‘आय.एस.बी.अँड एम.’ मधील विद्यार्थीदशेत संस्थेचे दरवाजे उघडण्यापासून लॅब, लायब्ररी चालवण्यापर्यंतची जबाबदारी विद्यार्थ्यांवर होती. त्यामुळे संस्था आपली मानून काम करण्याची आणि उद्योग उभारण्याची शिकवण मिळाली. हेच माझे पहिले ‘स्टार्टअप’ होते. आज स्वतःची कंपनी चालवताना त्या अनुभवाचा मोठा फायदा होत आहे.’
-संदीप बक्षी माजी विद्यार्थी ‘आय.एस.बी.अँड एम.’
——
कोट:
‘आय.एस.बी.अँड एम.’ मध्ये प्रवेश घेतला, तेव्हा आम्ही दुसरी बॅच होतो. त्या काळात डॉ. प्रमोद कुमार हेच आमच्यासाठी संस्थेची ओळख होते. त्यांच्या मार्गदर्शनातून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि ‘गो-गेटर’ दृष्टिकोन विकसित झाला. ‘कधीही हार मानू नका’ ही त्यांनी दिलेली शिकवण आजही प्रत्येक आव्हानाला सामोरे जाताना प्रेरणा देते. सध्या दिल्ली-गुडगाव येथे हेल्थकेअर क्षेत्रात कार्यरत असून, ‘ओपीडी शुअर’ च्या माध्यमातून विशेष मुलांसाठी सेवा देत आहे.’

-नीरज कपूर, माजी विद्यार्थी ‘आय.एस.बी.अँड एम.’
—-
कोट:
‘माजी विद्यार्थ्यांना २० ते २२ वर्षांनंतर भेटताना खूप आनंद होत आहे. अनेक माजी विद्यार्थी प्रथमच या कॅम्पसमध्ये आले असून त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून समाधान वाटते. पुढील कार्यक्रमात ते सध्याच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून करिअर निवड आणि व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन करतील. या समूहातील अनेक जण बहुराष्ट्रीय कंपन्या, मीडिया क्षेत्रात वरिष्ठ पदांवर कार्यरत असून काहींनी यशस्वी उद्योजक म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अनुभवातून सध्याच्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा आणि योग्य दिशा मिळेल.’
-डॉ. प्रमोद कुमार संस्थापक अध्यक्ष ‘आय.एस.बी.अँड एम.’

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments