Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात रंगणार महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्सचा चौथा सोहळा * दिनांक...

पुण्यात रंगणार महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्सचा चौथा सोहळा * दिनांक ५ सप्टेंबर शिक्षक दिनी आयोजन * सनीज वर्ल्ड येथे ३० शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नेतृत्वाचा होणार गौरव

* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

* Pass98 पुन्हा प्रमुख प्रायोजक

—————————————-

पुणे : शिक्षण क्षेत्रातून घडणारे विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राला अपेक्षित असलेले कुशल मनुष्यबळ यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्सच्या चौथ्या सोहळ्याचे आयोजन येत्या ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले आहे. हा सोहळा पुण्यातील सनीज वर्ल्ड येथे रंगणार आहे.

जॉबिझ्झाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातील ३० मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला एआय-आधारित मुलाखत सराव प्लॅटफॉर्म Pass98 याहीवर्षी प्रमुख प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत.

या सोहळ्यास महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे, तर अण्णासाहेब बनसोडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, एनस्क्वेअर एक्सपर्ट्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश कांकरिया, पुण्याचे जीएसटी आयुक्त दिनेश भोईर, अतिरिक्त जीएसटी आयुक्त प्रसाद गोरसे, पुणे विभागाचे अतिरिक्त सीमाशुल्क आयुक्त शिवकुमार साळुंखे, शालेय शिक्षण विभागाच्या राजपत्रित अधिकारी दीपाली दिवेकर, सहाय्यक योजना अधिकारी राजेश वारकाडे, यवतमाळ माध्यमिक शिक्षण वेतन पथकाचे अधीक्षक अतुल चंद्रशेखर वानखेडे, ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ राघवेंद्र कुमार आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आनंद राज आनंद यांच्यासह विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि महाराष्ट्र थिंक टँकचे ज्युरी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

“जिथे शैक्षणिक क्षेत्र उद्योगाचा सन्मान करते आणि उद्योग क्षेत्र शैक्षणिक क्षेत्राचा सन्मान करते” ही या पुरस्कारांची मध्यवर्ती संकल्पना आहे. शिक्षण संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यात अधिक परिणामकारक संवाद आणि सहकार्य निर्माण करून भविष्यातील रोजगाराच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. या पुरस्कारांचा मुख्य उद्देश शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेली कौशल्ये यांच्यातील दरी कमी करणे हा आहे. सध्याच्या पारंपरिक व्यवस्थेत शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना घडवतात आणि उद्योग त्यांची भरती करतात, अशी विभागणी दिसून येते. मात्र बदलत्या तंत्रज्ञानाच्या आणि रोजगाराच्या गरजांच्या पार्श्वभूमीवर ही चौकट बदलण्याची आवश्यकता आहे. शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे भविष्यासाठी सक्षम मनुष्यबळ घडवावे, हा दृष्टिकोन या पुरस्कारांच्या माध्यमातून पुढे नेण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत शिक्षण क्षेत्रातील कुलपती, कुलगुरू, अधिष्ठाता, संचालक आणि प्राचार्य, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील सीईओ, सीएचआरओ, सीएक्सओ, व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक अशा ३० लीडर्सचा गौरव करण्यात येणार आहे. शिक्षण आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांतील नेतृत्वाला एकाच व्यासपीठावर आणणे हा या सोहळ्याचा महत्त्वाचा भाग आहे.

पुण्यातील टॅलेंट आणि एचआर सोल्युशन्स कंपनी जॉबिझ्झाचे संस्थापक डॉ. गौरव शर्मा हे या पुरस्कारांचे संस्थापक आहेत. २०१४ पासून जॉबिझ्झा भरती, प्रशिक्षण, स्टाफिंग आणि प्लेसमेंट क्षेत्रात सेवा देत आहे.

या कार्यक्रमाविषयी डॉ. गौरव शर्मा म्हणाले, “या सोहळ्याच्या तीन यशस्वी वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेसाठी योगदान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. या राष्ट्रीय प्रगतीसाठी विकसित महाराष्ट्र ही गुरुकिल्ली आहे आणि हा उपक्रम त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रातील विसंगतीकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, “कॉर्पोरेट कंपन्या म्हणतात की त्यांना योग्य उमेदवार मिळत नाहीत, तर शैक्षणिक क्षेत्र म्हणते की नोकऱ्याच उपलब्ध नाहीत. हीच दरी भरून काढण्यासाठी आम्ही महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्सची निर्मिती केली. शिक्षक दिन म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस निवडण्यामागेही विशेष कारण आहे. आपल्या शिक्षकांचा सन्मान करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.”

यंदाच्या सोहळ्यात Pass98 पुन्हा एकदा प्रमुख प्रायोजक म्हणून सहभागी झाला आहे. एआय-आधारित मुलाखत सरावासाठी विकसित करण्यात आलेला हा प्लॅटफॉर्म विद्यार्थी तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना लाइव्ह एआय व्हॉइस इंटरव्ह्यू, तत्काळ अभिप्राय आणि विविध क्षेत्रांनुसार रेडिनेस स्कोअरिंगची सुविधा उपलब्ध करून देतो. तंत्रज्ञान, वित्त, कन्सल्टिंग, मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि एचआर यांसारख्या क्षेत्रांतील नोकरीच्या मुलाखतींसाठी उमेदवारांना अधिक चांगली तयारी करता यावी, हा त्यामागील उद्देश आहे.

Pass98 चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख प्रायोजक नितेश कांकरिया म्हणाले, “शैक्षणिक शिक्षण आणि उद्योगाच्या अपेक्षा यांच्यात मोठी तफावत आहे. मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही दरी भरून काढण्याच्या उद्देशाने Pass98 काम करते. एक कॉर्पोरेट संस्था म्हणून शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्राला एकत्र आणणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे ६०० हून अधिक शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नेतृत्वाला एका व्यासपीठावर आणणाऱ्या या सोहळ्याचे प्रायोजकत्व करताना आम्हाला अभिमान वाटतो.”

जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यवतमाळच्या संचालिका आणि पुरस्कारांच्या प्रायोजक शितल वाटिले यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र एज्युकेशन अवॉर्ड हा शिक्षण क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या अथक परिश्रमांचा गौरव करत हा उपक्रम शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्राला जोडणारा आहे. त्याचबरोबर निरंतर प्रगती आणि नाविन्याला प्रेरणा देणारा आहे.”

शिक्षण आणि रोजगाराचे बदलते स्वरूप, कृत्रिम बुद्धिमत्ता, नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांनीही आपल्या अभ्यासक्रमांमध्ये आणि प्रशिक्षण पद्धतींमध्ये बदल करणे आवश्यक बनले आहे. त्याचवेळी उद्योग क्षेत्रानेही केवळ तयार मनुष्यबळ शोधण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासात सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे. या दोन्ही क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून केला जात आहे.

चौथ्या वर्षात प्रवेश करताना महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट अवॉर्ड्सने शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामध्ये संवादाचे व्यासपीठ निर्माण करण्याचा आपला प्रयत्न पुढे नेला आहे. भविष्यातील रोजगाराच्या गरजा, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानातील बदल यांचा विचार करता “भविष्यासाठी सज्ज महाराष्ट्र आपण एकत्र कसा घडवू शकतो?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शिक्षण आणि उद्योग क्षेत्राने एकत्र येणे ही काळाची गरज बनली आहे. या दिशेने हा पुरस्कार सोहळा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments