Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedमराठी भाषातपस्विनी प्रा. यास्मिन शेख* प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड संस्थापक...

मराठी भाषातपस्विनी प्रा. यास्मिन शेख* प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड संस्थापक अध्यक्ष, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत.

*

आपला भारत देश हा ऋषीमुनींचा, साधुसंतांचा, सतीसाध्वींचा, संत-सज्जनांचा, शूर-वीरांचा देश आहे. इथे त्याग शिकावा, निर्लेपता शिकावी, स्वाभिमान शिकावा, वचनपूर्ती शिकावी, नैतिकता शिकावी, निर्गर्विता शिकावी, नम्रता शिकावी, सहिष्णुता शिकावी आणि सर्वधर्मसमभावही शिकावा अशी ही पुण्यभूमी आहे. अशा या हजारो वर्षांपासून, सत्य व ज्ञानाची पूजा करणाऱ्या पुरातन भारतवर्षात जन्म मिळणे कठीण, आणि त्याहूनही महाराष्ट्रात जन्म मिळणे हे दुरापास्त आहे, असे म्हटले गेले आहे-

दुर्लभं भारते जन्म: । महाराष्ट्रे सुदुर्लभम् ।।

अशा या महाराष्ट्राला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमधील थोर मानवरत्नांची परंपरा लाभलेली आहे. यांपैकीच एक म्हणजे थोर मराठी भाषाशास्त्रज्ञ प्रा. यास्मिन शेख. प्रा. शेख यांच्या दुःखद निधनामुळे मराठी भाषेची खरोखरच कधी न भरून येईल अशी पोकळी निर्माण झाली आहे.

एक थोर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आणि “मराठी भाषातपस्विनी’ असे ज्यांना संबोधता येईल अशा प्रा. यास्मिन शेख यांच्या जाण्यामुळे अभिजात मराठी भाषा आणि या भाषेचे उपासक, यांच्यामधील दुवा कायमचा निखळला आहे, हे निश्चित.

नाशिक जिल्ह्याने मराठी भाषेला अनेक रत्ने दिली. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, असे कितीतरी… हे सगळे साहित्यिक अथवा लेखक म्हणून नावलौकिक मिळवून असले, तरी नाशिकमध्येच १९२५ साली एका ज्यू कुटुंबात जन्मलेल्या जेरुशा रुबेन अर्थात यास्मिन शेख यांनी मराठी भाषाशास्त्राला एक वेगळेच परिमाण मिळवून दिले यात शंका नाही.

मराठी भाषेवर त्यांचे निर्व्याज प्रेम होते. ती शुद्ध लिहिली आणि बोलली गेली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. वास्तविक, भाषा ही दोन व्यक्तींमधील संवादाचा सेतू असावी, बांध नको, हेच त्यांचे मत होते. मराठी भाषेच्या व्याकरणशुद्धीवर त्यांचा विशेष भर होता. मराठी व्याकरण देखील एखाद्या कवितेप्रमाणे त्या शिकवायच्या असे त्यांच्याकडून मराठी शिकलेल्या काही विद्यार्थ्यांचे म्हणणे असायचे.

“मराठी शब्दलेखन कोश’ हा त्यांचा ग्रंथ म्हणजे समग्र मराठी लेखक, पत्रकार, मुद्रितशोधक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शिकाच होता. त्याचप्रमाणे, “मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि “मराठी शुद्धलेखन कोश’ हे ग्रंथ देखील अभ्यासूंसाठी पथदर्शक होते.

प्रा. यास्मिन शेख यांना महाराष्ट्र शासनाने तसेच इतर संस्थांतर्फे डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यास पुरस्कार, ग. ना. जोगळेकर पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवान्वित केले होते.

माझ्या ज्येष्ठ भगिनी त्यागमुर्ती प्रयाग आक्का कराड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी कर्तबगार महिलांना पुरस्कार दिले जातात. गेली काही वर्षे, हा पुरस्कार प्रा. यास्मिन शेख यांनी स्वीकारावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या हा पुरस्कार स्वीकारू शकल्या नाहीत याची खंत आमच्या मनात कायमची राहील.

सध्या इंटरनेटमुळे ज्ञानप्राप्तीचे मुबलक स्रोत उपलब्ध आहेत. परंतु अपुऱ्या साधनांच्या काळात अतिशय नेटाने, जिद्दीने व प्रयत्नपूर्वक संशोधन करणारे प्रा. शेख यांच्यासारखे संशोधक बहुधा बोटांवर मोजण्याइतकेच आजकाल दिसून येतात.

मराठी भाषा ही विविध जाती धर्माच्या साहित्यिकांनी समृद्ध केली आहे. मराठी ही एका विशिष्ट जातीची किंवा धर्माची भाषा नसून, जो महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतो, त्याची ती मातृभाषाच असते, असा दृढ विश्वास असणाऱ्या, विद्वान भाषाशास्त्रज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक उत्तम माणूस असलेल्या प्रा. यास्मिन शेख यांना मी, माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे,चे विश्वस्त, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments