Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णय*

आदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णय*

 

 

पुणे, दि. १०: आदिवासी विकास विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळा व वसतिगृहांमध्ये १९ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’राबविण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याची माहिती उपायुक्त संतोष ठुबे यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र शासनाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी ‘सर्पदंश’ हा अधिकृतपणे अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांचे वेळेवर अहवाल सादर करणे, सखोल निरीक्षण, प्रतिबंधात्मक उपाय तसेच सर्पविष प्रतिबंधक लसीची (एएसव्ही) उपलब्धता आणि साठवणूक केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

 

आदिवासी विकास विभागांतर्गतच्या संस्था या प्रामुख्याने डोंगराळ आणि वनक्षेत्रालगत असल्याने विद्यार्थ्यांचा साप, विंचू तसेच इतर वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची भौतिक सुरक्षितता जोपासण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनासोबतच सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद आणि वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यासह यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याच्या उद्देशाने सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान हाती घेतले आहे.

 

सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियानाअंतर्गत या संस्थांच्या स्तरावर स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ, आरोग्य व वन विभागाच्या सहकार्याने किमान एक तासाचे विशेष जनजागृती सत्रे आयोजित करण्यात येणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखणे, शांतपणे दूर जाणे, प्रथमोपचार, सर्पदंशाबाबत अंधश्रद्धा व गैरसमज, सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करणे, सर्पदंश झाल्यास न घाबरता बाधित व्यक्तीची हालचाल कमी ठेवणे आणि तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करणे आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय विभागाच्या डिजिटल स्टुडिओतही याबाबत तज्‍ज्ञांची सत्रे होणार आहे.

 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती सत्रादरम्यान कोणताही जीवंत साप शाळेच्या परिसरात आणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

 

*दर तीन महिन्यांनी माहितीचे अद्ययावतीकरण*

मुख्याध्यापक, अधीक्षक आणि परिचारिका यांना आपत्कालीन संपर्कांची माहिती दरतीन महिन्यांनी अद्ययावत करावी लागणार आहे. त्यात जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक, एएसव्ही उपलब्ध असलेल्या, साठवणूक केलेल्या आरोग्य संस्थेची माहिती, आपत्कालीन वाहतूक व्यवस्था व संपर्क क्रमांक, स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक आदींचा समावेश असणार आहे. तसेच अभियानादरम्यान केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा लागणार आहे.

 

*गोपीचंद कदम, आयुक्त, आदिवासी विकास विभाग:* आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता ही सर्वाधिक प्राधान्याची बाब आहे. सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियानामुळे दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील हजारो विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये सर्पदंशाबाबत जनजागृती होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत प्राण वाचविण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments