पुणे : भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या एकात्म स्वरूपाचे प्रतीक असलेल्या ‘हरिहर’ संकल्पनेवर आधारित भव्य मंदिराची उभारणी अखिल मंडई मंडळाकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठी करण्यात येत आहे. शेषशायी विष्णूची मूर्ती, शिवपिंड तसेच शिव-विष्णूच्या समन्वयाचे दर्शन घडविणाऱ्या या काल्पनिक मंदिराच्या माध्यमातून भक्तांना ऐक्य, समरसता आणि परस्पर सन्मानाचा संदेश देण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
अखिल मंडई मंडळाच्या उत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. हरिहर मंदिराची ही संकल्पना भगवान विष्णू अर्थात ‘हरि’ आणि भगवान शिव अर्थात ‘हर’ यांच्या एकात्म स्वरूपावर आधारित आहे. पालनकर्ता विष्णू आणि परिवर्तनाचे अधिष्ठाता भगवान शिव यांचे हे एकत्रित रूप विविधतेत एकतेचा संदेश देणारे आहे.
तब्बल ९० बाय ६० फूट आकाराच्या मंडपात २५ फूट उंचीचे हे मंदिर पूर्णपणे फायबरमध्ये साकारण्यात आले असून, देखाव्याची भव्यता भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे.
या मंदिरामध्ये शेषशायी विष्णूची मूर्ती, शिवपिंड यांसह हिंदू धर्मातील विविध पवित्र प्रतीकांचा समावेश करण्यात आला आहे. पारंपरिक मंदिराची रचना, धार्मिक प्रतीके आणि सजावटीच्या माध्यमातून शैव आणि वैष्णव परंपरांचा सुंदर समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या भव्य मंदिराची कलात्मक संकल्पना आणि निर्मिती कलादिग्दर्शक विशाल ताजनेकर आणि गजेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर फायबरमध्ये साकारण्यात आले असून, २५ फूट उंचीमुळे त्याची भव्यता अधिक उठून दिसणार आहे.
अण्णा थोरात म्हणाले, हरिहर मंदिराची संकल्पना ही भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या एकात्मतेचा संदेश देणारी आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तांमध्ये ऐक्य भावना निर्माण व्हावी, हा या देखाव्यामागील उद्देश आहे.


