पुणे/पिंपरी (प्रतिनिधी) दि. ११ सप्टेंबर २०२६:- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी अश्लील व विभत्स डीजे डान्सप्रकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्याला यश आले आहे. पुणे जिल्ह्यात अशा प्रकारांविरोधात प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले असून, हीच मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.अश्लील डीजे डान्सच्या वाढत्या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिमेला धक्का बसत असल्याचे सांगत टीना शर्मा घेवारे यांनी महाराष्ट्र शासन तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त, गृह विभाग तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात निवेदने देऊन कारवाईची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.
या पाठपुराव्यामध्ये चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.कलाकारांच्या वतीने प्रशासनाकडे सातत्याने हा प्रश्न मांडण्यात आला असून, त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि निवेदने आपल्याकडे उपलब्ध असल्याचे घेवारे यांनी सांगितले.“आमच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून अशा प्रकारांवर कारवाई होत आहे, ही समाधानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
*महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपण्याची मागणी*
महाराष्ट्राला महापुरुष,संतांची, समाजसुधारकांची आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेची भूमी म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील आणि विभत्स प्रकार वाढू नयेत.गेल्या काही वर्षांत विविध कार्यक्रमांमध्ये अश्लील नृत्यप्रकार वाढले असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.महाराष्ट्राची एक समृद्ध परंपरा आहे. महाराष्ट्राची ओळख ही संतांची आणि सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आहे. त्यामुळे अशा प्रकारांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी आम्ही भूमिका घेतली असे घेवारे यांनी स्पष्ट केले.
*प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा*
या प्रश्नावर महाराष्ट्र शासनातील संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे पोलीस प्रशासनाकडेही निवेदने देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.पुण्यातूनच अशा प्रकारांविरोधातील ठोस कारवाईला सुरुवात व्हावी, ही आपली प्रमुख मागणी होती आणि आता त्याची अंमलबजावणी होताना दिसत असल्याचे घेवारे यांनी सांगितले.
*इतर जिल्ह्यांमध्येही कारवाईची मागणी*
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईचे स्वागत करताना ही मोहीम केवळ पुण्यापुरती मर्यादित न ठेवता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेषतः एका शहराची किंवा जिल्ह्याची ओळख वापरून इतर ठिकाणी कार्यक्रमांमध्ये अश्लील डीजे डान्स सादर केले जात असतील, तर त्यावरही प्रशासनाने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारांमुळे संबंधित कलाकारांसोबतच त्या शहराची किंवा राज्याची प्रतिमाही खराब होऊ शकते.त्यामुळे कार्यक्रमांना परवानगी देताना नियमांचे काटेकोर पालन, संबंधित कलाकारांची जबाबदारी आणि आयोजकांवर नियंत्रण याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्या पद्धतीने आमच्या मागणीवर पुणे पोलीस प्रशासन आणि शासनाने अंमलबजावणी केली आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही कारवाई व्हावी. पुणे असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, अश्लील डीजे डान्सप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी,” असे त्यांनी म्हटले.कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अश्लीलतेला आळा घालता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


