पिंपरी(प्रतिनिधी)दि. १६ सप्टेंबर २०२६: पिंपरी भाजी मंडई शेजारील सेंट्री चाळ परिसरात वाकडकर असोसिएट मार्फत सुरु असलेला SRA प्रकल्प हा पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने, सर्व नियम पायदळी तुडवून सुरु आहे. या बेकायदेशीर बांधकामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी SRA कडे केली आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक भाजी विक्रेते, दुकानदार आणि सेंट्री चाळीतील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पाया खोदताना शेजारील इमारतींना तडे जात असून, FSI, पर्यावरण व महापालिकेच्या कोणत्याही परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आहे.
तसेच यावेळी बोलताना दाखले म्हणाले की, “जसा बहुजन समाजाचा प्रामुख्याने मातंग समाजाचा राजकीय वापर लोकप्रतिनिधींनी केला, तसाच प्रकार आता पिंपरीतील गरीब नागरिकांच्या घरावर बुलडोझर फिरवून केला जात आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. क्रांतीवीर लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊ साठे यांचा विचार जपणारा आमचा समाज अन्यायाविरुद्ध नेहमी लढत आला आहे.”
या बेकायदेशीर प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी बिल्डरवर गुन्हा दाखल करावा व जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत बांधकामाला पूर्ण स्थगिती द्यावी. अन्यथा नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्या
त आला.


