गडचिरोली | सप्टेंबर 17, 2026: ह्युंडाई मोटर इंडिया फाउंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडच्या (एचएमआयएल) सीएसआर शाखेने आपल्या H₂OPE उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 134 शासकीय शाळांमध्ये जल शुद्धीकरण आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी एचएमआयएफच्या आधीच्या टप्प्यातील कार्याची विशेष प्रशंसा केली होती. त्यांनी गडचिरोलीतील या उपक्रमाचा प्रभाव अधोरेखित करत जिल्ह्यातील आणखी 100 शाळांपर्यंत हा विस्तार करण्याचा विचार करण्याचे आवाहन ह्युंडाई मोटर इंडियाला केले होते, ज्याचा विस्तार आता करण्यात आला आहे.
2.95 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून राबवण्यात आलेला हा प्रकल्प समाजाचे कल्याण करणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला पाठबळ देणे आणि भारत सरकारच्या जल जीवन मिशन, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय 6 सर्वांसाठी सुरक्षित पिण्याचे पाणी, यांच्याशी सुसंगत राहून शाश्वत विकासाला गती देण्याप्रती एचएमआयएफच्या कटिबद्धतेवर भर देतो.
या चालू टप्प्याचा अधिकृत हस्तांतरण सोहळा सोनापूर येथील कमलाताई मुनघाटे हायस्कूलमध्ये पार पडला. यावेळी श्री. अविश्यांत पांडा (IAS), जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, गडचिरोली आणि श्री राजेंद्र एम. भुयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्यासह शासकीय शाळांचे प्रतिनिधी आणि ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.
या टप्प्याच्या पूर्ततेसह, एचएमआयएफच्या H₂OPE उपक्रमाने पूर्वीच्या 250 शाळांमधील कार्याचा विस्तार करत आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 384 शासकीय शाळांपर्यंत पोहोच वाढवली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सुरू झाल्यापासून या उपक्रमात एकूण 8.36 कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक झाली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे.
प्रकल्पाचा हा टप्पा विद्यार्थी, शिक्षक, शालेय कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांसह अंदाजे 26,000 हून अधिक लाभार्थ्यांपर्यंत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा पोहोचवतो. शाळांच्या आवारात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा खात्रीशीर पुरवठा सुनिश्चित करून उत्तम आरोग्य व स्वच्छतेच्या सवयींना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांचे कल्याण करणे आणि अधिक निरोगी शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या प्रसंगी मत व्यक्त करत श्री. अविश्यांत पांडा (IAS), जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, गडचिरोली म्हणाले, “शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे हे निरोगी आणि फलदायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी मूलभूत आहे. प्रोजेक्ट H₂OPE मुलांचे कल्याण आणि जिल्ह्याचा विकास याप्रती असलेली सामूहिक कटिबद्धता दर्शवतो. ह्युंडाई मोटर इंडिया फाउंडेशनने दिलेले हे सहकार्य शासकीय शाळांमधील पाण्याची उपलब्धता अधिक सुलभ करेल आणि हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकेल. आम्ही या विचारपूर्वक राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करतो आणि गडचिरोलीतील मुले व समाजासाठी या उपक्रमाच्या दीर्घकालीन लाभांची अपेक्षा करतो.”
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत श्री. पुनीत आनंद, एव्हीपी अँड व्हर्टिकल हेड, कॉर्पोरेट अफेयर्स, कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड सोशल, ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड म्हणाले, “शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही आरोग्य, सन्मान आणि शिक्षणाची मूलभूत पायाभरणी आहे. प्रोजेक्ट H₂OPE च्या माध्यमातून गडचिरोलीतील मुलांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अधिक सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत सहयोग करताना ह्युंडाई मोटर इंडिया फाउंडेशनला अभिमान वाटतो. शाळांमध्ये या उपक्रमाचा यशस्वी विस्तार केल्यानंतर आम्हाला हा प्रकल्प औपचारिकरीत्या जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करताना अत्यंत आनंद होत आहे, जे स्थानिक समाजासाठी याचा अखंडित लाभ सुनिश्चित करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम शासन आणि उद्योग यांच्यातील सशक्त सहयोगाचा प्रभाव दर्शवतो, तसेच आमच्या ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’ या जागतिक दृष्टिकोनाला अनुसरून मुलांसाठी अधिक आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याची ह्युंडाईची कटिबद्धता दर्शवतो.”
H₂OPE उपक्रमाच्या या टप्प्याअंतर्गत, एचएमआयएफने खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत:
· आयएसओ (ISO) प्रमाणित आरओ (RO) युनिट्स आणि वॉटर कुलर्स
· सहा स्तरीय पाण्याच्या साठवणूक टाक्या
· पाण्याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी टीडीएस / पीएच (TDS / pH) मीटर्स
दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी, शालेय कर्मचाऱ्यांना बसवण्यात आलेल्या यंत्रणेचे कामकाज आणि देखभाल याविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलांमधील सर्जनशील अभिव्यक्तीला वाव देण्यासाठी स्वच्छताविषयक जनजागृती सत्रे, तसेच चित्रकला स्पर्धांसह विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले.
या उपक्रमाचे उद्धिष्ट केवळ पाण्याची पायाभूत सुविधा उभारण्यापुरते मर्यादित नसून अधिक निरोगी व समान संधी असलेले भविष्य घडवण्याबाबत आहे. अनेक मुलांसाठी, विशेषतः विद्यार्थिनींसाठी, शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध असल्यामुळे शालेय उपस्थितीत वाढ, एकाग्रतेत सुधारणा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अधिक आत्मविश्वास मिळतो. अशा प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याणाच्या क्षेत्रात निरंतर प्रभाव निर्माण करत, एचएमआयएफ महाराष्ट्रातील तरुणांच्या सर्वांगीण विकासाप्रती असलेली आपली कटिबद्धता सातत्याने सिद्ध करत आहे.


