प्रगत उपचारपध्दतींसोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांमधील सहकार्य हे पेरिटोनियल सरफेस कर्करोगाच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरेल – प्रा.ऑलिव्हियर ग्लेहेन
पुणे, 18 सप्टेंबर 2026 : पेरिटोनियल सरफेस कर्करोगाच्या उपचारांचे भविष्य हे रूग्णानुसार वैयक्तिकृत उपचार,कमीतकमी छेद असलेली व रोबोटिक शस्त्रक्रिया, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान तसेच भारतातील आणि जगभरातील कर्करोग तज्ञांमधील अधिक दृढ सहकार्यामध्ये आहे,असे मत फ्रान्सच्या जीआय (जठरांत्र) व पेरिटोनियल सरफेस मॅलिग्नन्सी सर्जरी विषयाचे प्राध्यापक ऑलिव्हियर ग्लेहेन यांनी व्यक्त केले.
ऑन्कोलॉजी ग्रुप ऑफ पुणे (ओजीपी 2026) तर्फे पेरिटोनियल सरफेस ऑन्कोलॉजी (ओटीपोटातील अवयवांच्या भोवती असणाऱ्या पातळ पडद्यावर होणारा कर्करोग) आणि गायनॅकोलॉजिक ऑन्कोलॉजी (स्त्रीरोगविषयक कर्करोगशास्त्र) या विषयांवर हयात रीजन्सी पुणे येथे आयोजित तिसऱ्या द्वैवार्षिक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीचे कर्करोग तज्ञांसह सुमारे 500 प्रतिनिधी सहभागी होते आणि कर्करोगाच्या गुंतागुंतीच्या आणि प्रगत अवस्थेतील निदान व उपचारांमधील प्रगतीवर चर्चा करण्यात आली. ही परिषद चिकित्सकांना आपले कौशल्य व अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी, उपचार क्षेत्रातील नव्या संशोधनावर चर्चा करण्यासाठी तसेच कर्करोग उपचारातील नाविन्यपूर्ण आणि बहुशाखीय दृष्टिकोनांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व्यासपीठ ठरली.
याप्रसंगी ऑन्कोलॉजी ग्रुप ऑफ पुणेचे अध्यक्ष व एम.एन.बुधराणी कॅन्सर इन्स्टिट्युट येथील वरिष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.देबांशु भादुरी,यांसह आयोजन सचिव व अपोलो हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.स्निता सिनुकुमार आणि सह्याद्रि हॉस्पिटल येथील कर्करोग तज्ञ डॉ.तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पेरिटोनियल सरफेस कर्करोगाविषयी बोलताना प्रा.ऑलिव्हियर ग्लेहेन म्हणाले की, हे कर्करोग प्रामुख्याने पोटाच्या भागापुरते मर्यादित असतात. सायटोरिडक्टिव्ह शस्त्रक्रिया आणि पेरिटोनेक्टॉमीमधील प्रक्रियांमधील एचआयपीईसी, पीआयपीएसी आणि एनआयपीएस यांसारख्या नवीन तंत्रांमुळे रूग्णांच्या उपचार परिणामांमध्ये सुधारणा करण्याच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. या कर्करोगासाठी प्रशिक्षित तज्ञांची टीम असलेली उपचार केंद्रे, पात्र रूग्णांची निवड आणि चिकित्सक,कर्करोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट तसेच पॅथॉलॉजिस्ट यांचा समावेश असलेला बहुशाखीय दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कर्करोगाच्या व्यवस्थापनात पुढील सुधारणा करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय माहितीचा वापर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑन्कोलॉजी ग्रुप ऑफ पुणेचे अध्यक्ष व एम.एन.बुधराणी कॅन्सर इन्स्टिट्युट येथील वरिष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.देबांशु भादुरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.ते म्हणाले की, 2020 साली शैक्षणिक व्यासपीठ व चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून स्थापना झालेल्या ऑन्कोलॉजी ग्रुप ऑफ पुणे या संस्थेमध्ये 200 हून अधिक सदस्य आहेत.
परिषदेच्या आयोजन समितीमध्ये इंद्रायणी हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.शैलेश नाईक, अपोलो हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.विदिता पोवले, रूबी हॉल क्लिनिक येथील कर्करोग तज्ञ डॉ.नागेश शिरसाट, अपोलो हॉस्पिटल येथील रेडिएशन आँकोलॉजिस्ट डॉ.श्वेता मुथा, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.अनुप ताम्हणकर, स्टर्लिंग हॉस्पिटल येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.राकेश नेवे, आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथील कर्करोग तज्ञडॉ.जयंत गावंडे आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील कर्करोग तज्ञडॉ.राहुल कुलकर्णी यांचा समावेश आहे.
या परिषदेत पेरिटोनियल सरफेसशी संबंधित कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, पेरिटोनियममध्ये प्रसार झालेला जठरांत्राचा कर्करोग, सायटोरिडक्टिव्ह शस्त्रक्रिया (सीआरएस) (पोटातील पोकळीमधील ट्युमर काढण्याची प्रक्रिया), हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल केमोथेरपी (एचआयपीईसी) (पुढच्या टप्प्यातील पोटाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया आणि विशिष्ट तापमानापर्यंत गरम केलेल्या केमोथेरपी औषधांद्वारे उपचार), गायनॅकोलॉजिक ऑन्कोलॉजी तसेच कर्करोग उपचारातील नवीन पद्धती यांवर तज्ञांनी चर्चा केली.
ओजीपी 2026 मध्ये पेरिटोनियल सरफेसवर परिणाम करणाऱ्या कर्करोगांच्या व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला. अशा प्रकारच्या कर्करोगांमध्ये अनेकदा गुंतागुंतीची वैद्यकीय आव्हाने निर्माण होतात आणि त्यासाठी अत्यंत विशेष कौशल्यासह बहुशाखीय उपचारांची आवश्यकता असते. या परिषदेत तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्र, सादरीकरण आणि संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली. याद्वारे सहभागी डॉक्टरांना आव्हानात्मक वैद्यकीय परिस्थिती आणि उपचारांच्या बदलत्या पद्धतींवर चर्चा करण्याची संधी मिळाली.
या परिषदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत तज्ज्ञ उपस्थित होते. यामध्ये मेडस्टार वॉशिंग्टन हॉस्पिटल सेंटर,युएसएच्या पेरिटोनियल सरफेस मॅलिग्नन्सी विभागाचे प्रमुख प्रा. पॉल शुगरबाकर, हॉस्पिसेस सिव्हिल्स डी.ल्योन, फ्रान्सच्या जीआय (जठरांत्र) व पेरिटोनियल सरफेस मॅलिग्नन्सी सर्जरी विषयाचे प्राध्यापक ऑलिव्हियर ग्लेहेन, नायरी मेडिकल सेंटर,अर्मेनियाच्या गायनॅकॉलॉजिक ऑन्कोलॉजी सर्व्हिसचे प्रमुख प्राध्यापक आर्टेम स्टेपनॅन आणि सीएचयू मोईझेस ब्रोगी,बार्सिलोना,स्पेन येथील पेरिटोनियल सरफेस मॅलिग्नन्सीज् युनिटचे प्रमुख आणि युरोपियन स्कुल ऑफ पेरिटोनियल सरफेस ऑन्कोलॉजी (ईएसपीएसओ) चे शैक्षणिक समन्वयक प्राध्यापक लाना बिजेलिक यांसारखे आंतरराष्ट्रीय तज्ञ सहभागी झाले.
कर्करोगाच्या उपचारांमधील प्रगतीमुळे हे अधिकाधिक दिसून येत आहे की,विशिष्ट प्रगत अवस्थेतील (स्टेज 4) कर्करोगाच्या काही निवडक रुग्णांना अधिक आक्रमक व बहुशाखीय पध्दतीचा फायदा होऊ शकतो.योग्यरित्या निवडलेल्या पात्र रूग्णांमध्ये आणि ट्युमरच्या प्रकारांमध्ये सायटोरिक्टिव्ह शस्त्रक्रिया आणि एचआयपीईसी यांसारख्या उपचार पध्दतींमुळे दीर्घकाळ रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि काही बाबतीत संभाव्य रोग बरा करण्यासाठी शक्यता निर्माण होऊ शकते.
या परिषदेत कर्करोग उपचारांमध्ये बहुशाखीय आणि रुग्ण केंद्रित दृष्टिकोनाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, गायनॅकोलॉजिक ऑन्कोलॉजी, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, ॲनेस्थेसियोलॉजी तसेच संबंधित आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ञांनी एकत्र येऊन गुंतागुंतीच्या कर्करोगांच्या बाबतीत रूग्ण परिणाम सुधारण्यामध्ये सहयोगात्मक निर्णय प्रक्रिया कशी महत्त्वाची ठरू शकते
,यावर चर्चा केली.


