Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे आरटीओमध्ये ‘MH-61’ मालिकेतील पसंती क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया*

पुणे आरटीओमध्ये ‘MH-61’ मालिकेतील पसंती क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया*

 

 

पुणे, दि. १ (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे ‘MH-61’ (क्र. MH 01 0001 पुढील) या मालिकेत मालवाहू, टुरिस्ट टॅक्सी, बस व ॲम्ब्युलन्स या परिवहन वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. तसेच खाजगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित शुल्कानुसार लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांकाकरिता अर्ज ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत परिवहन नवीन नोंदणी विभागात स्वीकारले जातील. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१५ वाजेपर्यंत स्वीकारले जातील व त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात लिलाव होईल.

परिवहन वाहनांसाठी पसंती क्रमांकाकरिता अर्ज ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत स्वीकारले जातील. लिलावाचे डीडी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१५ वाजेपर्यंत स्वीकारून त्याच दिवशी दुपारी ४ वाजता लिलाव करण्यात येईल.

लिलावासाठीचा डीडी ‘R.T.O., Pune’ या नावाने पुणे येथील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असावा. डीडी दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. एका अर्जदाराने एकाच क्रमांकासाठी एकच डीडी सीलबंद पाकिटात सादर करावा. ‘Pune R.T.O.’ या नावाने सादर केलेले किंवा विहित शुल्कापेक्षा कमी रकमेचे डीडी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

समान रकमेचे डीडी प्राप्त झाल्यास संबंधित क्रमांकाची निवड अर्जदारांच्या नावाच्या चिठ्ठीद्वारे करण्यात येईल. लिलावाच्या वेळी अर्जदार उपस्थित असो वा नसो, लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

पसंतीचा नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याची वैधता महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८१ मधील नियम ५४-अनुसार १८० दिवस आहे. अर्जदार हा पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पत्त्याचा वाहनधारक असणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज, चुकीच्या रकमेचा डीडी किंवा अचूक मोबाईल क्रमांक नसलेले अर्ज बाद करण्यात येतील. पसंती क्रमांकासाठी महाराष्ट्र शासनाच्या दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सुधारित शुल्क लागू राहील.

लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पसंती क्रमांकांचे वितरण fancy.parivahan.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन करण्यात येणार असून त्यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहणार नाही.

लिलावात पसंती क्रमांक न मिळालेल्या अर्जदारांनी आपला मूळ डीडी ७ दिवसांच्या आत कार्यालयातून परत घ्यावा. त्यानंतर डीडीच्या परताव्याबाबत कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments