Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedनटसम्राट हरपला… नाना, तुमचा असा अचानक निरोप मनाला...

नटसम्राट हरपला… नाना, तुमचा असा अचानक निरोप मनाला चटका लावून गेला… मंत्री चंद्रकांत पाटील यांचीभावपूर्ण श्रद्धांजली!

 

 

ज्येष्ठ अभिनेते, माझे अत्यंत जवळचे स्नेही नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला सुन्न करून गेली. वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला, यावर अजूनही विश्वास बसत नाही.   अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांची झालेली भेट, तो आपुलकीचा संवाद आणि नेहमीप्रमाणे झालेली मनमोकळी चर्चा आजही जशीच्या तशी माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्या भेटीतली त्यांची ऊर्जा आणि जिवाभावाचा सहवास पाहून कोणाला वाटलंही नसेल की ही आपली शेवटची भेट ठरेल… आज ही बातमी ऐकताना त्या भेटीच्या आणि संवादांच्या आठवणींचा पट मनात दाटून येत आहे.

 

मराठी रंगभूमीपासून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अफाट अभिनयाने, खणखणीत संवादफेकीने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने नानांनी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अग्निसाक्षी’ आणि ‘खामोशी’ अशा एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी अभिनयाचा नवा मानदंड निर्माण केला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री सन्मानाने त्यांच्या महान कलाप्रतिभेचा गौरव झाला, तरीही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले.

 

माझा आणि नानांचा स्नेह जुना आणि जिव्हाळ्याचा होता. त्यांच्या कडक आणि स्पष्टवक्त्या स्वभावामागे एक अत्यंत हळवं, संवेदनशील आणि माणसांवर मनापासून प्रेम करणारं हृदय होतं. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि गरजूंसाठी त्यांनी उभारलेले सामाजिक कार्य असो किंवा सामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती, नाना नेहमीच एका संवेदनशील माणसाच्या भूमिकेत जगले.

 

आज मी केवळ एक महान कलावंत गमावला नाही, तर माझ्या मनाच्या जवळचा एक आपुलकीचा सोबती गमावला आहे. नानांचे जाणे ही भारतीय कलाक्षेत्राची, समाजकारणाची आणि आपल्या सर्वांचीच कधीही भरून न निघणारी हानी आहे.

 

नाना, तुम्ही साकारलेल्या अजरामर भूमिका आणि तुमच्या आठवणी मनात सदैव जिवंत राहतील.

 

कलासृष्टीच्या या खऱ्या ‘नटसम्राटाला’ माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

 

ॐ शांती!

 

#NanaPatekar

 

https://www.facebook.com/share/p/17zcJgBGJz/?mibextid=wwXIfr

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments