पुणे, दि.२२: प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे जिल्हा परिषदेच्या सभापती दिपालीताई दीपक हुलावळे यांच्या हस्ते उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हास्तरावरून डॉ. माधवी शिंदे जिल्हा साथरोग अधिकारी, श्रीमती संगीता करंजकर सहाय्यक प्रशासन अधिकारी, डॉ. सुवर्णा आरोटे तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती जगताप व डॉ. हर्षल उइके, तालुकास्तरीय पर्यवेक्षक अभिजीत काळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर कार्ला येथील कातकरी वस्तीला सौ. हुलावळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजले. तसेच बालकांना प्रोत्साहनपर फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या अभियानांतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे मावळ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
००००


