Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedसेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण*

सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण*

 

 

पुणे, दि. ८: महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सिद्धबेट, आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

 

हा उपक्रम वोडाफोन इंटेलिजंट सोल्युशन्स यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत राबविण्यात आला असून, वोडाफोन आयडिया फाउंडेशन यांनी या उपक्रमाची संकल्पना व अंमलबजावणी केली आहे. तसेच इंडिव्ह कन्सल्टन्सी यांनी अंमलबजावणी भागीदार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशी माहिती माधव खांडेकर मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांनी दिली.

 

*मियावाकी वनाची संकल्पना*

 

सिद्धबेट परिसरात विकसित करण्यात येत असलेले हे मियावाकी वन अल्प जागेत कमी कालावधीत दाट, स्वयंपूर्ण आणि स्थानिक जैवविविधतेने समृद्ध जंगल निर्माण करण्याच्या उद्देशाने उभारले जात आहे. या पद्धतीत स्थानिक वृक्षप्रजातींची दाट लागवड केली जाते, त्यामुळे झाडांची वाढ वेगाने होते आणि काही वर्षांत नैसर्गिक जंगलासारखी समृद्ध वनराई विकसित होण्यास मदत होते.

 

या वनाचा उद्देश शहरातील हरित क्षेत्र वाढविणे, कार्बन डायऑक्साइड शोषून हवेची गुणवत्ता सुधारणे, पक्षी, फुलपाखरे व इतर जीवांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण करणे, शहरी तापमान कमी करणे तसेच ध्वनी व धूळ प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणे हा आहे. भविष्यात हे वन कमी देखभालीत टिकणारे स्वयंपूर्ण पर्यावरणीय क्षेत्र म्हणून विकसित होणार आहे.

 

*लोकसहभागातून साकारलेला उपक्रम*

 

या महत्त्वपूर्ण सीएसआर उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी हितेश वधवानी यांनी विशेष पुढाकार घेत समन्वयाची भूमिका पार पाडली. वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प केला आणि प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे जतन करण्याचे आवाहन केले.

 

सिद्धबेट, आळंदी येथे विकसित होणारे हे मियावाकी वन भविष्यात शहरासाठी हरित फुफ्फुस (Green Lung) ठरणार असून, स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक आळंदी घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments